IND vs NZ: मॅच दरम्यान अंपायरने का केली कर्णधाराकडे या बॉलरची तक्रार
अंपायरला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे या बॉलरची तक्रार का करावी लागली.
IND vs NZ TEST: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) कानपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याच सामन्यात भारतीय वंशाचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलही न्यूझीलंडकडून खेळत आहे. सामन्यादरम्यान त्याने असे कृत्य केले, ज्यासाठी अंपायरला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे तक्रार करावी लागली.
भारतीय इनिंगच्या 77 व्या ओव्हरमध्ये स्पिनर एजाज पटेलने मेडन ओव्हर टाकली. पण त्याने बरेच बॉल हे बाहेरच्या बाजुला टाकले. त्यामुळे फील्ड अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी कर्णधार केन विल्यमसनकडे याबाबत तक्रार केली. यानंतर विल्ययमसनने एजाजला समज दिली.
एजाजची ही संपूर्ण ओव्हर डेब्यू मॅच खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने खेळली. एजाज पटेल आणि श्रेयस अय्यर या दोघांचा जन्म मुंबईत झाला हाही विचित्र योगायोग म्हणावा लागेल. दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध सामने खेळत असताना. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे क्वचितच पाहायला मिळते की फलंदाज आणि गोलंदाज एकाच शहरातील आहेत आणि एकमेकांविरुद्ध खेळत आहेत.
अंपायरने तक्रार केली तोपर्यंत एजाज पटेलने 20 ओव्हर टाकले होते. यादरम्यान त्याने 6 मेडन ओव्हर्स टाकले आणि एकूण 76 धावा दिल्या. एजाजला त्याच्या पहिल्या 20 ओव्हरपर्यंत कोणतेही यश मिळाले नाही. श्रेयस अय्यर 77 व्या षटकापर्यंत 118 चेंडूत 66 धावा करत खेळत होता.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात इतकी चांगली झाली नाही. 21 धावांवर मयंक अग्रवालच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. इथून चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी संघाला थोडंसं सांभाळलं, पण 106 पर्यंत पोहोचेपर्यंत हे दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रूपाने भारतीय संघाने 145 धावांवर चौथी विकेट गमावली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 4 बाद 258 धावा केल्या आहेत.