India vs Pakistan Live Match Start Time In India: अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आज भारतीय संघ पाकिस्तानाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. न्यूयॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैदानात उतरण्याआधी भारतीय संघाचा कसून सराव सुरु आहे. अ गटामधील भारताचा आणि पाकिस्तानचाही हा दुसराच सामना असणार आहे. मात्र अमेरिकेत खेळवला जाणारा हा सामना किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार? भारत आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड कसा आहे? यासारखा तपशील जाणून घेऊय़ात...


दोन्ही संघ एक-एकदा जिंकलेत वर्ल्ड कप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी यापूर्वी टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. भारताने 2007 साली खेळवण्यात आलेल्या पहिल्याच पर्वामध्ये अंतिम सामन्यात जोहान्सबर्गच्या मैदानावर पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं. तर पाकिस्तानने दुसऱ्या पर्वात म्हणजेच 2009 जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र त्यानंतर या दोन्ही संघांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्याने अपयश आलं आहे. पाकिस्तानने 2022 च्या अंतिम फेरीत धडक मारलेली मात्र तिथे ते पराभूत झाले होते. 


भारताचा पहिला विजय पण पाकिस्तान अमेरिकेकडून पराभूत


भारताचं नेतृत्व रोहित शर्मा करत असून पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडला 8 विकेट्सने सहज पराभूत केलं. दुसरीकडे सामन्यात पाकिस्तानला साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकी संघाकडून सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं. आजच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचा सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा मानस धुळीस मिळेल असं चित्र दिसत आहे. त्यामुळे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा एकप्रकारे करो या मरोचा सामना आहे. 


भारत-पाकिस्तानचा टी-20 रेकॉर्ड कसा?


भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत टी-20 मध्ये एकमेकांविरुद्ध 12 सामने खेळले असून भारताने यापैकी 8 सामने जिंकलेत. पाकिस्तानने तीन सामने जिंकले असून एक अनिर्णित राहिला आहे. विशेष म्हणजे या 12 पैकी 7 सामने टी-20 वर्ल्ड कपमधील आहेत. सर्वात आधी हे दोन्ही संघ 2007 च्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आमने-सामने आलेले. सामना अनिर्णित राहिल्याने बोल्ड आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आलेला जो भारताने जिंकला होता. 


टी-20 वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड कसा?


टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला केवळ 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करण्यात यश मिळालं होतं. हा सामना दुबईत खेळवण्यात आलेला. हे दोन्ही संघ यापूर्वी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेलबर्नच्या मैदानात आमने-सामने आलेले जो सामना भारताने जिंकला होता.


कुठे पाहता येणार सामना?


आज भारत आणि पाकिस्तानदरम्यान न्यूयॉर्कमध्ये होणारा सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. या सामन्याचं टीव्हीवरील लाइव्ह प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या वाहिन्यांवरुन होणार आहे. हॉटस्टार डॉट कॉमवर सामना लाइव्ह पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स 1 (एचडी+ एसडी), स्टार स्पोर्ट्स 2 (एचडी-एसडी), स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 (एचडी+ एसडी), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी+ एसडी), स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमीळ (एचडी+ एसडी), स्टार स्पोर्ट्स 1 तेलगू (एचडी+ एसडी), मा गोल्ड, स्टार स्पोर्ट्स 1 कानडा, सुवर्ण प्लस एसडी आणि डीडी स्पोर्ट्स या वाहिन्यांवर सामना लाइव्ह पाहता येईल.


कधी सुरु होणार सामना?


हा सामना आज म्हणजेच 9 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.