Ind vs Pak : विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी `लई भारी`, पाहा आकडेवारी
जाणून घ्या, एकदिवसीय आणि टी20 विश्वचषकात भारताने आतापर्यंत कितीवेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे
मुंबई : आयससी टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) एकाच गटात असून 24 ऑक्टोबरला दोन्ही संघ आमने सामने येतील. क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान सामन्याची नेहमीच उत्सुकता असते. आता टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने दुबईच्या मैदानात (Dubai International Cricket Stadium) पुन्हा या दोन संघात तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. सर्व क्रिकेट जगताच्या नजरा या लढतीवर खिळल्या आहेत. यानिमित्ताने आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत आपण भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या आकडेवारीवर नजर टाकणार आहोत.
विश्वचषक स्पर्धेतली आकडेवारी
1975 साली पहिली एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (ODI Cricket World Cup) खेळवण्यात आली. पण भारत आणि पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा आमने सामने आले ते 1992 मध्ये. त्यानंतर एकदिवसीय आणि टी20 विश्वषचक (T20 Cricket World Cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 12 वेळा आमने सामने आले आहेत. आणि प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे.
1992 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोनही संघ पहिल्यांदा आमने सामने आले. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली आणि यानंतर विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धची विजयाची ही परंपरा भारतीय संघाने कायम ठेवली. बारा सामन्यांपैकी सातवेळा एकदिवसीय सामन्यात तर पाचवेळा टी20 सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली आहे.
टी20 विश्वचषकातील आकडेवारी
टी20 विश्वचषक स्पर्धेचा विचार केला तर 2007 च्या पहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमने सामने आले. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोनवेळा खेळले, आणि दोन्ही वेळा भारताने विजय मिळवला. चुरशीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करत पहिला वहिला टी20 विश्वचषक आपल्या नावावर केला होता.
यानंतर 2012 विश्वचषक स्पर्धेत सुपर एटमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडले, आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला भारताकडून पराभव स्विकारावा लागला होता.
2014 आणि 2016 टी20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये या दोनही टीममध्ये सामने रंगले. आणि दोनही वेळा भारताने विजयी पताका कायम ठेवला. 2009 आणि 2010 टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना झाला नाही.
एक दिवसीय विश्वचषकातही भारताचं पारडं जड
एकदिवसीय विश्वचषकाचा विचार केला तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान 7 वेळा सामने रंगले. 1992 मध्ये बेनसन अँड हेजेस विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर 43 धावांनी मात केली होती. यानंतर 1996, 1999 आणि 2003 विश्वचषक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला विजयाची संधी दिली नाही.
2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने आले. सेमीफायनलच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 29 धावांनी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. याच वर्षी भारताने श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.
2015 मध्ये ग्रुप स्टेटमध्ये भारत-पाकिस्तान संघ भिडले, या सामन्यातही भारताने पाकिस्तानवर 76 धावांनी विजय मिळवला. यानंतर शेवटचे म्हणजे दोन वर्षांपूर्वी 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानदरम्यान सामना रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी धुव्वा उडवला होता.
हे सर्व आकडे आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील आहेत. आता 13 व्यांदा दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत आमने सामने येणार आहेत. येत्या 24 ऑक्टोबरला म्हणजे रविवारी हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.