नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण अफ्रिकेच्या मैदानावर शानदार विजय मिळवला. त्यामुळे माथी लागलेला तब्बल पाव शतकाचा कलंक मोडीत काढण्यास भारताला यश आले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या मालिकेत सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यात लक्षवेधी खेळी ठरली ती रोहीत शर्माची. गेल्या काही दिवसात रोहितचा सूर भलताच हरवला होता. मात्र, दक्षिण अफ्रिकेविरूद्ध त्याला हा सूर गवसला. त्यामुळे शतकी खेळी करत पुन्हा एकदा तो हिट ठरला.


सूर हरवला, सूर गवसला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या ५व्या एक दिवसीय सामन्यात रोहितने शानदार शतक झळकावले. या मालिकेत रोहित आपला सूर हरवून बसला होता. त्यामुळे त्याला त्याच्या खेळीला साजेशी अशी विशेष खेळी करता आली नाही. मालिकेच्या पहिल्या ४ सामन्यात तो केवळ ४० धावाच (२०+१५+०+५) बनवू शकला.  त्यामुळे पाचवा एक दिवसीय सामना खेळण्यासाठी त्याची झालेली निवड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.


टीकाकारांच्या तोंडात कोंबला बोळा


रोहितच्या निवडीबाबत अनेकांच्या मनात एक नकारात्मकता होती. अनेकांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या होत्या. त्याच्या खेळीबाबतही तशी साशंकताच होती. मात्र, कोणाच्याही टीकेला भीक न घालात रोहितने मैदानावर पाऊल ठेवले आणि शानदार शतक झळकावले. या निमित्ताने त्याने आपण गेलेला सूर केव्हाही परत आणू शकतो हेही दाखवून दिले. त्याच्या या खेळीने टीकाकारांच्या तोंडात मात्र चांगलाच बोळा कोंबला गेला. 


१० चौकार ४ षटकार ठोकत शतकी खेळी


अखेरच्या सामन्यात शानदार पुनरागमण करत त्याने एकदिवसीय करिअरमध्ये त्याने १७वे शतक ठोकले. १०७ चेंडूमध्ये १० चौकार आणि ४ जबरदस्त षटकारांच्या सहाय्याने त्याने आपले शतक झळकावले. हे शतक ठोकताना तो जबरदस्त खेळी करत होता. मात्र, एक क्षण असा आला की, सर्वांनीच श्वास रोखून धरले. आता तो बाद होणार असे वाटले. पण, खेळ हा उत्कंटा वाढवणारा आणि रोमांचक असेल तरच त्यात मजा असते. दक्षिण अफ्रिकेकडून नजरचूक घडली आणि रोहितला जीवदान मिळाले. या जीवदानाचा त्याने पुरेपूर वापर करत शतक झळकावले.


रोहितच्या जीवदानाचा थरार..


रोहित ९६ वर खेळत होता. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ एक चौकार किंवा षटकार गरजेचा होता. दक्षिण अफ्रिकेकडून रबाडा गोलंदाजी करत होता. सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. एका बेसावद क्षणी रबाडाने बाऊन्सर टाकला. त्याने हा चेंडू थर्ड मॅन बाऊंड्रीकडे स्लाईस केला. इथे वेगवान फिरकी गोलंदाज शस्मी उभा होता. तो अत्यंत चपळाईने चेंडूजवळ गेला. या वेळी रोहित धोक्यात गेला. श्वास रोखले गेले. पण, शस्मीचा अंदाच चुकला. झेल सुटला. रोहितला जीवदान मिळाले. ज्याचे त्याने सार्थक केले.