IND vs WI 3rd T20: तिसऱ्या टी20 सामन्यात मोठा बदल, BCCI ची ट्विट करून माहिती
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, तिसऱ्या टी20 सामन्यात होणार मोठा बदल
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. सोमवारी खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दोन्ही संघ 1-1ने बरोबरीत आहेत. दरम्यान आता तिसऱ्या टी20 सामन्यात मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने या संदर्भातली माहीती दिली आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs WI T20) मंगळवारी (2 ऑगस्ट) वॉर्नर पार्क, सेंट किट्स येथे खेळवला जाईल. हा सामना रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाणार होता, मात्र आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 पासून सुरू होणार आहे. सामन्याच्या नव्या वेळेची माहिती BCCI (Board of Control for Cricket in India) ने ट्विट करून दिली आहे.
बीसीसीआयने सांगितले की, तिसऱ्या टी-20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जुन्या वेळापत्रकानुसार हा सामना भारतीय वेळेनुसार 8 वाजता सुरू होणार होता, पण आता नाणेफेक 9 वाजता होणार आहे आणि पहिला चेंडू 9:30 वाजता टाकला जाणार आहे.
'या' कारणामुळे सामन्याला उशीर
पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील ही दुसरी वेळ आहे जेव्हा सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामनाही वॉर्नर पार्कवर खेळला गेला. हा सामना देखील भारतीय वेळेनुसार 8 वाजता सुरू होणार होता, परंतु हा सामना रात्री 11 वाजता सुरू झाला. क्रिकेट वेस्ट इंडिजने आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले होते की, त्रिनिदाद ते सेंट किट्सपर्यंत संघाच्या महत्त्वाच्या वस्तू पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे हा सामना उशिरा सुरू होईल.
दरम्यान 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या प्रत्येकी 1-1 ने बरोबरीत आहेत. आजच्या तिसऱ्या सामन्यावर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.