हरमनप्रीत कौरने बॅटने दाखवली तिची जुनी स्टाईल, मोडला स्मृती मानधनाचा ६ वर्ष जुना विक्रम
IND-W vs SL-W: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये, भारतीय संघाने तिसऱ्या गट सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा 82 धावांनी एकतर्फी पराभव करून शानदार विजय मिळवला.
Harmanpreet Kaur: दुबईच्या मैदानावर मंगळवारी भारतीय महिला संघाने ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या (ICC Women's T20 World Cup 2024) श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दमदार कामगिरी केली. भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव करून शानदार विजय मिळवला. भारतीय टीमने 20 षटकात 172 धावांची मोठी खेळी केली. यानंतर श्रीलंकेच्या संघाचा डाव केवळ 90 धावांवर रोखून धरला. धावांचा डोंगर उभा करताना कर्णधार हरमनप्रीत कौरची जुनी स्टाईल बघायला मिळाली. तिने केवळ 27 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावांची नाबाद खेळी केली. याच दमदार खेळासोबत तिने स्मृती मानधनाचा ६ वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला.
भारताने झळकावले सर्वात जलद अर्धशतक
कर्णधार हरमनप्रीत कौरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सुमारे 193 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. तिने शेवटच्या दोन चेंडूंवर सलग चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले. या उत्तम खेळी सोबत ती महिला T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारी खेळाडू बनली आहे. हा विक्रम या आधी स्मृती मंधानाच्या नावावर होता. स्मृतीने 2018 साली झालेल्या T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केवळ 31 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
हे ही वाचा: महिला चाहत्याला बघून रोहित शर्माने थांबली कार आणि... बघा viral video
महिला T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी भारतीय खेळाडू
हरमनप्रीत कौर - 27 चेंडू (वि श्रीलंका, दुबई, वर्ष 2024)
स्मृती मानधना - 31 चेंडू (वि ऑस्ट्रेलिया, गयाना, 2018)
हरमनप्रीत कौर - 32 चेंडू (वि. ऑस्ट्रेलिया, केपटाऊन, 2023)
हरमनप्रीत कौर - 33 चेंडू (वि न्यूझीलंड, गयाना, 2018)
मिताली राज - 36 चेंडू (वि श्रीलंका, बसेटेरे, 2010)
हे ही वाचा: IND vs BAN: सूर्याने बांगलादेशच्या जखमेवर लावलं मीठ, कसोटीनंतर T-20 मालिकाही आली हातात!
उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय आवश्यक
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात, 82 धावांनी विजय मिळवून आपला खराब रनरेट सुधारला आहे. यामुळेच टीम इंडियाने अ गटातील गुणतालिकेत थेट दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे आता टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा गट सामना जिंकणे आवश्यक आहे.