तिरुवनंतपुरम : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये खेळपट्टीवर सूर्यप्रकाश आल्यामुळे मॅच थांबवण्यात आली होती. भारतीय बॅट्समनना प्रखर सूर्यप्रकाशामुळे बॉल दिसण्यात अडचण येत असल्यामुळे अर्ध्या तासासाठी मॅच थांबवण्यात आली होती. हे उदाहरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा एका विचित्र कारणामुळे मॅच थांबवावी लागली आहे. भारत ए आणि इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये तिरुवनंतपुरममध्ये मॅच झाली. ही मॅच सुरु असताना मधमाश्या मोठ्या प्रमाणावर मैदानात आल्या. यामुळे सामना १५ मिनिटांसाठी थांबवावा लागला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मॅच बघायला आलेल्या काही जणांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्याचं बोललं जातंय. इंग्लंड लायन्सची बॅटिंग सुरु असताना २८व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. मधमाश्या घोंगावत असल्यामुळे प्रेक्षकही सुरक्षित स्थळ शोधत होते. भारत ए टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड याचीही मधमाश्यांमुळे धावपळ झाली.


मधमाश्यांमुळे सामना थांबवण्यात आल्याची ही पहिली वेळ नाही. २०१७ साली दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेमधली वॅण्डरर्सवर झालेली मॅच मधमाश्यांमुळे थांबवण्यात आली. मधमाश्यांपासून वाचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे फिल्डर आणि श्रीलंकेच्या बॅट्समनना मैदानातच झोपून राहावं लागलं होतं.



धोनीनं पहिलं शतक मारलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमवेळीही मैदानात मधमाश्या आल्या होत्या. नुकताच पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या टेस्ट मॅचवेळीही मधमाश्या मैदानात आल्यामुळे खेळ थांबवावा लागला होता.



भारताचा विजय


मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे भारत ए आणि इंग्लंड लायन्समधला सामना काही काळ थांबवण्यात आला असला तरी याचा मॅचच्या निर्णयावर काहीही परिणाम झाला नाही. ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत एनं इंग्लंड लायन्सचा ६ विकेटनं पराभव केला. या सामन्यात पंतने ७६ बॉलमध्ये ७३ रनची खेळी करत ६ फोर आणि ३ सिक्सच्या मदतीने भारतीय टीमला विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलं. यामुळे भारताने २२२ रनचं लक्ष्य सहज गाठलं. इंडिया 'ए' टीमची इंग्‍लंड लायंसच्या विरुद्ध हा लागोपाठ चौथा विजय आहे.


तिरुवनंतपूरममध्ये झालेल्या या सामन्यात इंग्‍लंड लायंसने आधी बॅटिंग करत ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत २२१ रन केले होते. ओली पोपने या सामन्यात १०३ बॉलमध्ये ६५ रन तर स्टीवन मुलानीने ५४ बॉलमध्ये ५८ रन केले होते. भारताकडून शार्दुल ठाकुर याने ४९ रन देत ४ विकेट घेतल्या. ५५ रनवरच इंग्लंड लायंसने ४ विकेट गमवल्या होत्या. पण त्यानंतर पोप आणि स्टीवनने खेळ सावरला.


इंडिया ए टीमने ४६.३ ओव्हरमध्ये ४ विकेट गमवत विजय मिळवला. या सामन्यात केएल राहुलने ७७ बॉलमध्ये ४२ रन केले. पंतने दीपक हुडासोबत १२० रनची पार्टनरशिप केली. हुडाने ४७ रन केले. इंग्‍लंडच्या विल जॅक्‍सने ३५ रन देत २ विकेट घेतले. सिरीजमधील शेवटचा आणि पाचवा सामना गुरुवारी खेळला जाणार आहे.