दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचे धक्के, भारत ३२९वर ऑल आऊट
इंग्लंडच्या बॉलरनी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्के दिले आहेत.
नॉटिंगहम : इंग्लंडच्या बॉलरनी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्के दिले आहेत. यामुळे भारताचा ३२९ रनवर ऑल आऊट झाला आहे. भारतानं दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं ३०७/६ अशी केली होती. पण ब्रॉडनं २ आणि अंडरसननं २ विकेट घेत भारताची इनिंग संपवली. दुसऱ्या टेस्ट मॅचमधल्या खराब कामगिरीनंतर भारतीय बॅट्समननी या मॅचमध्ये पुनरागमन केलं. ओपनर शिखर धवन आणि लोकेश राहुलनं ६० रनची पार्टनरशीप केली. यानंतर मात्र भारताची अवस्था ८३-३ अशी झाली. पण कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं भारतीय बॅटिंग सावरली. कोहली आणि रहाणेमध्ये १५९ रनची पार्टनरशीप झाली. विराटनं १५२ बॉलमध्ये ९७ रन केले तर अजिंक्य रहाणेला १३१ बॉलमध्ये ८१ रन करता आले.
इंग्लंडकडून अंडरसन, ब्रॉड आणि क्रिस वोक्सनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर आदिल रशीदला एक विकेट मिळाली. विराटनं आदिल रशीदच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये उभा असलेल्या स्टोक्सला कॅच दिला. या दौऱ्यामध्ये रशीदनं कोहलीला चौथ्यांदा आऊट केलं आहे. रशीदनं वनडे सीरिजमध्ये विराटला दोनवेळा आऊट केलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये विराट दुसऱ्यांदा नरवस नाईंनटीजचा शिकार झाला. याआधी २०१३ साली जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहली ९६ रनवर आऊट झाला होता.
पाच टेस्ट मॅचच्या सीरिजच्या पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे सीरिज जिंकण्याचं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.