माउंगानुई : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या वनडेत सोमवारी भारताचा दणदणीत विजय झाला. या विजयासह भारताने मालिका ही जिंकली आहे. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने म्हटलं की, भारतीय टीम त्यांना धडा शिकवत आहे. विलियमसनने म्हटलं की, न्यूझीलंडचे बॉलर चांगली बॉलिंग करत आहे पण त्यांना सुरुवातीला अधिक विकेट घेण्याची गरज आहे. भारत 5 सामन्यांच्या सिरीजमध्ये 3-0 ने आघाडीवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलियमसनने म्हटलं की, 'भारतीय टीमचे खेळाडू आम्हाला धडा शिकवत आहेत. आम्हाला त्या आव्हानासाठी स्वत:ला आणखी तयार करण्याची गरज आहे. या सामन्यात टीममध्ये काही सुधार पाहायला मिळाला. पण आम्हाला आणखी सुधार करण्याची गरज आहे.'


या सामन्यात न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक 93 रन केले. विलियमसनने म्हटलं की, 'या विकेटवर चांगला खेळ दाखवणं सोपं नाही. टेलरने शानदार कामगिरी केली. आमची बॉलिंग चांगली आहे. पण आम्हाला सुरुवातीला अधिक विकेट घेण्याची गरज आहे.'


न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 7 विकेटनं दणदणीत विजय झाला. 244 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं सर्वाधिक 62 रन तर कर्णधार विराट कोहलीनं 60 रन केले. अंबाती रायडूने नाबाद 40 तर दिनेश कार्तिकनं नाबाद 38 रन केले. न्यूझीलंडकडून बोल्टला 2 तर सॅण्टनरला 1 विकेट मिळाली.


या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानं या मॅचमध्ये धोनीऐवजी कार्तिकला आणि विजय शंकरऐवजी हार्दिक पांड्याला संधी दिली होती. न्यूझीलंडला भारतीय बॉलरनी सुरुवातीपासूनच चांगले धक्के दिले. पण रॉस टेलर आणि टॉम लेथम यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. मोहम्मद शमीनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.