ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धची टी-२० सीरिज ५-०ने जिंकल्यानंतर भारतीय टीमचा वनडे सीरिजमध्ये पराभव झाला आहे. लागोपाठ २ वनडे मॅचमध्ये भारताला पराभूत व्हावं लागलं आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा २२ रनने पराभव झाला. पहिल्या मॅचमध्येही न्यूझीलंडने भारताला ४ विकेटने मात दिली होती. ३ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये न्यूझीलंडने २-०ची विजयी आघाडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरिज गमावल्यासोबतच भारताच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. सर्वाधिक वनडे मॅच हरण्याचा विक्रम भारतीय टीमने केला आहे. ९८६ वनडे मॅचपैकी भारताने ४२३ मॅच हारल्या आहेत, तर ५१३ मॅचमध्ये विजय झाला आहे. भारताच्या ९ मॅच टाय झाल्या आणि ४१ मॅच रद्द झाल्या.


भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये पोहोचली तेव्हा त्यांच्या नावावर वनडेमध्ये ४२१ पराभव होते. श्रीलंकेचेही वनडे क्रिकेटमध्ये भारताएवढेच पराभव झाले होते, पण या २ मॅच गमावल्यानंतर भारताने श्रीलंकेला मागे टाकलं आहे. श्रीलंकेने ८४९ वनडे मॅचपैकी ३८६ मॅच जिंकल्या आहेत. श्रीलंकेचा विजयाची टक्केवारी ४७.८४ तर भारताची ५४.७६ टक्के आहे.


भारत आता न्यूझीलंडविरुद्धची शेवटची वनडे मॅच खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे खेळणार आहे. या ४ मॅचनंतर पुढचे काही महिने भारताच्या वनडे मॅच नाहीत. दुसरीकडे श्रीलंका वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. जर वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा ३-०ने पराभव केला, तर सर्वाधिक पराभवाचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होईल. यासाठी भारताला तिसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा पराभव करावा लागेल. तिसऱ्या वनडेमध्येही भारताचा पराभव झाला, तर मात्र हा विक्रम भारताच्या नावावर राहिल.