मुंबई : टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली याने पुलवामा येथील हल्ल्यातील शहींदाप्रती संवेदना व्यक्त करत पाक सोबत खेळण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान सोबत खेळण्याबाबत सरकार आणि बीसीसआयच जी भूमिका घेईल त्यासोबत आम्ही आहोत असे विराट कोहली म्हणाला. महत्त्वाचं म्हणजे सचिन तेंडूलकर आणि सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर जोर दिला आहे. पण विराटने एकदम साधी सरळ आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. पाकिस्तानसोबत खेळून त्यांना हरवा, त्यांना फुकटचे गुण देऊ नका अशी भूमिका सचिनने मांडली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 मे पासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात खेळू नये अशी मागणी देशभरातून होत आहे. हरभजन सिंह, सौरव गांगुली आणि युजवेंद्र चहल सारख्या खेळाडूंनी पाकिस्तानवर पूर्ण बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. भारत 16 जूनला पाकिस्तान विरुद्ध खेळला नाही तर तो आपला पराभव असेल असे सुनील गावस्कर यांनी सांगितले. 



सचिन तेंडूलकरनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. आता पुन्हा त्यांना हरवण्याची वेळ आली आहे. त्यांना फुकटचे दोन पॉईंट्स मिळावेत असं मला वैयक्तिक वाटत नाही. तसं केल्यास त्यांना मदत होईल. पण माझ्यासाठी भारत सर्वस्व आहे. माझा देश जो काही निर्णय घेईल त्याचे स्वागत आणि समर्थन करेन असे सचिनने म्हटले होते. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या समितीने अद्याप यावर कोणता निर्णय घेतला नाही आहे.