मुंबई : टी20 विश्वचषकानंतर (ICC T20 World Cup) भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं असून आता रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय टी20 क्रिकेट संघाचं (Team India) नेतृत्व करेल. कोहलीकडे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाचं कर्णधारपद कायम आहे. पण या दोन्ही प्रकारात त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शास्त्री यांचा दावा


टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि सलग चार वर्ष विराट कोहलीबरोबर टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी शक्यता वर्तवली आहे की येणाऱ्या काळात विराट कोहली एकदिवसीय आणि कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडू शकतो. आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतो असा दावा रवी शास्त्री यांनी केला आहे.


विराट कोहलीने टी-20 विश्वचषकापूर्वीच या टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. उर्वरित दोन फॉर्मेटमध्ये संघाचं नेतृत्व करण्यासाठी स्वत:ला फिट राखण्यासाठी टी20 संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचं कारण विराट कोहलीने दिलं होतं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली असली तरी त्याला आयसीसीच्या एका स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही.


विराट कोहलीवर दडपण


यामुळे विराट कोहलीवर मोठं दडपण आहे. टी20 फॉर्मेटनंतर एकदिवसीय संघांचं कर्णधारपदही त्याच्याकडून काढून घेतलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे. कारण मर्यादीत षटकांसाटी एकच कर्णधार ठेवण्याच्या मनस्थितीत बीसीसीआय (BCCI) आहे, आणि येणाऱ्या काही दिवसात बीसीसीआय याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


रवी शास्त्री यांनीही हेच संकेत दिले आहेत. विराट कोहली कदाचित एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो, जेणेकरून क्रिकेटच्या सध्याच्या परिस्थिती त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता येईल.


2017 पासून टीम इंडियाचं नेतृत्व


विराट कोहलीने 2015 मध्ये कसोटी संघाचं आणि 2017 मध्ये एकदिवसीय संघाचं नेतृत्व हाती घेतलं. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला. 38 विजयांसह विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.