नवी दिल्ली : शेवटच्या २ ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला पहिल्या टी-२०मध्ये सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचता आलं आहे. या मॅचमध्ये बांगलादेशला विजयासाठी १४९ रनचं आव्हान मिळालं आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंग करणाऱ्या बांगलादेशने भारताला २० ओव्हरमध्ये १४८/६ वर रोखलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने १९व्या ओव्हरमध्ये १४ रन आणि २०व्या ओव्हरमध्ये १६ रन केल्यामुळे या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. वॉशिंग्टन सुंदर ५ बॉलमध्ये १४ रनवर नाबाद आणि कृणाल पांड्या ८ बॉलमध्ये १५ रनवर नाबाद राहिला. शिखर धवनने सर्वाधिक ४१ रनची खेळी केली.


पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये २ फोर मारल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ९ रनवर आऊट झाला. यानंतर ठराविक अंतरानंतर भारताला धक्के लागतच होते. केएल राहुल १५, श्रेयस अय्यर २२ आणि ऋषभ पंत २७ रन करून आऊट झाले. आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा शिवम दुबे फक्त १ रन करुन माघारी परतला.


बांगलादेशकडून शैफूल इस्लाम आणि अमिनुल इस्लामला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या, तर अफीफ हुसेनला १ विकेट घेण्यात यश आलं. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.