`भारत आपला शत्रू नाही`, पाकिस्तानचे हे दोन क्रिकेटर एकमेकांना भिडले
पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरने आपल्या सहकाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत.
नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानच्या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये जोरदार वाद सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया अनेक मुद्द्यांवर आमने-सामने आले आहेत. आता या वादात भारताचाही प्रवेश झाला आहे, कारण दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीच्या एका वक्तव्याला उत्तर देताना भारत आमचा शत्रू नसल्याचे म्हटले आहे.
शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानिश कनेरिया म्हणाला, 'भारत आमचा शत्रू नाही. आमचे शत्रू तेच लोक आहेत जे आम्हाला धर्माच्या नावाखाली चिथावणी देत आहेत. जर तुम्हाला भारत आमचा शत्रू वाटत असेल तर कोणत्याही भारतीय वाहिनीवर कधीच जाऊ नका.
दानिश कनेरिया आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीवर मोठे आरोप केले होते आणि तो म्हणाला की शाहिदने त्याला अनेक वेळा इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले होते, परंतु मी त्याचे शब्द कधीच गांभीर्याने घेतले नाहीत.
दानिशच्या आरोपांना आफ्रिदीचे प्रत्युत्तर
दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीवर गैरवर्तन, छळवणूक यासह अन्य काही आरोप केले होते. शाहीद आफ्रिदीने एका मुलाखतीत या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, जर त्याला (दानिश) माझ्या वागणुकीची अडचण होती, तर त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे तक्रार का केली नाही? तो आपल्या शत्रू देशाला (भारत) मुलाखती देत आहे, अशा गोष्टी धार्मिक भावना भडकावू शकतात.
शाहिद आफ्रिदी म्हणाला की, जो माझ्यावर आरोप करत आहे, त्याने स्वत:चे चारित्र्य पाहावे. केवळ पैसा आणि स्वस्त लोकप्रियतेसाठी तो हे करत आहे, त्यामुळे त्याचे म्हणणे विचारात घेऊ नये. शाहिद आफ्रिदी इथेच थांबला नाही, त्याने दानिश कनेरियाने स्पॉट फिक्सिंग करून देशाचे नाव खराब केल्याचा आरोप केला.
दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 261 विकेट्स आहेत. निवृत्तीनंतर दानिश कनेरियाने अनेकवेळा आरोप केला आहे की, पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये हिंदू असल्याने त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले आहे.