चौथ्या टेस्टमध्ये भारताचा पराभव, सीरिजही गमावली
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे.
साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे. याचबरोबर भारतानं ५ टेस्ट मॅचची सीरिज ३-१नं गमावली आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन करत मॅच २०९ रननं जिंकली होती. पण आता चौथ्या टेस्टमध्ये पुन्हा भारतानं निराशा केली. मोईन अलीच्या फिरकीसमोर भारतीय बॅट्समननी नांगी टाकली. त्यानं इंग्लंजकडून सर्वाधिक चार बळी घेतले. भारताचा दुसरा डाव १८४ रनवरच आटोपला. आणि भारतीय टीमला ६० रननी पराभव सहन करावा लागला.
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाला विजय साकारुन देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. विराट कोहलीनं ५८ धावा आणि अजिंक्य रहाणेनं ५१ धावांची खेळी केली. विराट आणि अजिंक्यचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला आपली छाप सोडता आली नाही. आता ७ सप्टेंबरपासून पाचव्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात विराटच्या ५०० रन पूर्ण
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकाबरोबरच कोहलीनं ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ५०० रनचा टप्पा ओलांडला आहे. ५८ रनवर विराट कोहली आऊट झाला. भारताबाहेरच्या टेस्ट सीरिजमध्ये ५०० रन करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू आहे. तसंच इंग्लंडमध्ये ५०० रन करणारा विराट पहिला आशियाई कर्णधार बनला आहे. इंग्लंडमध्ये ५०० रन करणारा विराट तिसरा भारतीय खेळाडू आहे.
पहिल्या टेस्टमध्ये विराटनं १४९ आणि ५१ रन, दुसऱ्या टेस्टमध्ये २३ आणि १७ रन, तिसऱ्या टेस्टमध्ये ९७ आणि १०३ रन आणि चौथ्या टेस्टमध्ये ४६ आणि ५८ रन केले. या सीरिजमध्ये विराट कोहलीनं आत्तापर्यंत ५४४ रन केले आहेत.