आयसीसीकडून टेस्ट क्रमवारी घोषित, भारत या क्रमांकावर
आयसीसीनं 2018-19 या वर्षाची पहिलीच क्रमवारी घोषित केली आहे.
दुबई : आयसीसीनं 2018-19 या वर्षाची पहिलीच क्रमवारी घोषित केली आहे. या क्रमवारीनुसार टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा पहिला क्रमांक अबाधित आहे. भारताकडे सध्या 125 पॉईंट्स आहेत. तर भारत आणि दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेमध्ये 13 पॉईंट्सचा फरक आहे. याआधी हा फरक 4 पॉईंट्सचा होता. भारत आणि ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजमध्ये हरवल्यामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पहिल्या क्रमांकावर राहिल्यामुळे भारताला 1 मिलियन यूएस डॉलर मिळाले आहेत तर दक्षिण आफ्रिकेला 5 लाख युएस डॉलर मिळालेत. भारताची पुढची टेस्ट अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये होणार आहे. अफगाणिस्तानचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पदार्पण असल्यामुळे ही मॅच ऐतिहासिक असेल. 14 ते 18 जूनदरम्यान बंगळुरूमध्ये ही मॅच खेळवली जाईल.
हे वर्ष भारतासाठी खडतर
या वर्षामध्ये भारताला तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध क्रिकेट खेळावं लागणार आहे. जुलैपासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये भारत इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारत 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या टीमविरुद्ध खेळताना आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.
आयसीसी टेस्ट क्रमवारी
1 भारत
2 दक्षिण आफ्रिका
3 ऑस्ट्रेलिया
4 न्यूझीलंड
5 इंग्लंड
6 श्रीलंका
7 पाकिस्तान
8 बांगलादेश
9 वेस्ट इंडिज
10 झिम्बाब्वे