दुबई : आयसीसीनं वनडेसाठीची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. बांगलादेशचा ३-०नं पराभव केलेली न्यूझीलंड पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयसीसीच्या या क्रमवारीत इंग्लंड १२६ अंकांसह पहिल्या क्रमांकावर, भारत १२२ अंकांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि ११२ अंक असलेली न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी न्यूझीलंडनं भारताविरुद्धची वनडे सीरिज ४-१नं गमावली होती. त्यामुळे क्रमवारीमध्ये न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर गेली होती. पण बांगलादेशविरुद्धची सीरिज जिंकल्यामुळे न्यूझीलंड पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या पुढे गेली आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका १११ अंकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धची सीरिज गमावल्यामुळे बांगलादेशला ३ अंकांचं नुकसान झालं आहे. तरी बांगलादेशची टीम सातव्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तान १०२ अंकांसह पाचव्या आणि ऑस्ट्रेलिया १०० अंकांसह सहाव्या क्रमांकावर आहे.


वनडे बॅट्समनच्या यादीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर तर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीतही जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर कुलदीप यादव चौथ्या आणि युझवेंद्र चहल पाचव्या क्रमांकावर आहे.


वनडे प्रमाणेच टेस्ट क्रिकेटमध्येही विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या कुसल परेरानं ५८ स्थानांची झेप घेतली आहे. विराटनंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली आणि पुजारा सोडून कोणताही भारतीय बॅट्समन पहिल्या १० मध्ये नाही.


आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत १३ वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा बॉलर पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीच्या बॉलरच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. याआधी २००६ साली ग्लेन मॅकग्रा पहिल्या क्रमांकावर होता. पॅट कमिन्सनं दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला पिछाडीवर टाकलं आहे. बॉलरच्या क्रमवारीत कमिन्सनंतर जेम्स अंडरसन आणि रबाडाचा क्रमांक आहे.


टेस्ट क्रमवारीत बॉलरच्या यादीत रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर, रवीचंद्रन अश्विन १०व्या क्रमांकावर, बुमराह १६व्या क्रमांकावर, मोहम्मद शमी १४व्या क्रमांकावर, इशांत शर्मा २८व्या क्रमांकावर आणि उमेश यादव ३१व्या क्रमांकावर आहे. 


टेस्ट बॉलरच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेला रविंद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर जेसन होल्डर आणि दुसऱ्या क्रमांकावर शाकिब अल हसन आहे.