India Set to Host ICC World Cup: भारत आणि क्रिकेट याचं वेगळं नातं आहे. त्यामुळे आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचं भारतात आयोजन करणं एक मोठी मेजवानी असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) यासाठी प्रयत्नशील असते. 26 जुलैला बर्मिंगममध्ये आयसीसीचं वार्षिक संमेलन पार पडलं.  या संमेलनात 2024 ते 2027 पर्यंत आयसीसी महिला व्हाइट बॉल ग्लोबल इव्हेंट्सचं आयोजन कुठे होईल?, याबाबत माहिती दिली. बीसीसीआयने विश्वचषक आयोजनासाठी मोठी बोली लावत जबाबदारी घेतली आहे.  2025 या वर्षी 50 षटकांचा महिला विश्वचषकाचं आयोजन भारतात केलं जाणार आहे. देशात एका दशकानंतर पुन्हा एकदा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. यापूर्वी 2013 मध्ये महिला विश्वचषकाचं आयोजन केलं होतं. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडिजला 114 धावांनी पराभूत करुन विश्वचषकावर नाव कोरलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने या व्यतिरिक्त महिला स्पर्धाच्या घोषणा देखील केली आहे. 2024 चा टी 20 विश्वचषक बांगलादेशमध्ये होईल. तर 2026 चा टी 20 वर्ल्डकप इंग्लंडमध्ये, 2027 चा वर्ल्डकप श्रीलंकेत होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं की, "आम्हाला आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप 2025  चं आयोजन करण्याची इच्छा होती आणि आम्हाला आयोजनाची संधी मिळाल्याने आनंद झाला आहे."



आयसीसीच्या बैठकीनंतर चेअरमन ग्रेग बार्कले यांनी सांगितलं की, "आम्ही बांगलादेश, भारत, इंग्लंड आणि श्रीलंका यांना आयसीसी महिला व्हाईट बॉल स्पर्धेचे यजमानपद देताना आनंद होत आहे. महिला खेळाच्या विकासाला गती देणे हे आयसीसीच्या धोरणात्मक प्राधान्यांपैकी एक आहे. 2016 नंतर प्रथमच भारताला महिलांच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. 2016 मध्ये, पुरुषांसोबत महिला टी 20 विश्वचषकाचे आयोजन केले होते."