मुंबई : जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये बांधून तयार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्टेडियमचं उद्घाटन होणार आहे. २४ फेब्रुवारीला हा कार्यक्रम होणार आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये डे-नाईट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२१ साली इंग्लंडची टीम भारतात असेल, तेव्हा हा सामना होईल. रविवारी दिल्लीमध्ये बीसीसीआयची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८-१९ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डे-नाईट टेस्ट मॅच खेळायला भारताने नकार दिला होता. कर्णधार विराट कोहलीने डे-नाईट टेस्ट मॅच खेळण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. पण सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर भारताने पहिला डे-नाईट सामना खेळला. बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ईडन-गार्डन मैदानात ही डे-नाईट टेस्ट मॅच झाली होती.


यंदाच्या वर्षी शेवटी भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावेळीही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डे-नाईट टेस्ट मॅच होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. यातल्या ब्रिस्बेन, ऍडलेड आणि पर्थ या स्टेडियमवर आधीच डे-नाईट टेस्ट मॅच झाल्या आहेत.


अहमदाबादमधलं सरदार पटेल स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्डेयियम असणार आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी १ लाख १० हजार प्रेक्षक मॅचचा आनंद घेऊ शकतात. याआधी ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) हे सगळ्यात मोठं स्टेडियम होतं. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकसंख्या १ लाखाच्या आसपास आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानात डे-नाईट टेस्ट मॅच होणार असली, तरी या मैदानात पहिला सामना कोणता होईल, याबाबत मात्र अजूनही माहिती मिळू शकलेली नाही.