India Squad For New Zealand Test Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी रात्री न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून केवळ यश दयालला वगळण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघचा उपकर्णधार असणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताने उपकर्णधार म्हणून कोणाचीही निवड केलेली नव्हती.


चार राखीव खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाबरोबर दोन नव्हते चार राखीव खेळाडू जाणार असून या खेळाडूंमध्ये नितेश रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि मयांक यादव या चौघांचा समावेश आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद शामीवर शस्रक्रीया झाली असून तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमध्ये कसून सराव करत आहे. असं असतानाही त्याला या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्येही संधी देण्यात आलेली नाही. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दावेदारी पक्की


भारताने बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम दोन संघांमधील आपलं स्थान अधिक बळकट केलं आहे. भारताने उरलेले आपले आठही कसोटी सामने जिंकले तर भारतच्या विजयाची टक्केवारी 85.09 टक्के इतकी होईल.


घरच्या मैदानावर भारताची उत्तम कामगिरी


कानपूरमधील कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहने सहा विकेट्स घेत जागतिक गोलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताचा फिरकीपटू आर. अश्विनला मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताने बांगलादेशविरुद्ध जिंकलेली कसोटी मालिकी ही घरच्या मैदानावरील सलग 18 अशी मालिका होती ज्यात संघाने विजय मिळवला. 2013 पासून भारत घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका पराभूत झालेला नाही. हिच आकडेवारी आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून अधिक बळकट करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.


भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या मालिकेतील कसोटी सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार?


पहिली कसोटी - 16 ते 20 ऑक्टोबर, एम. चेन्नास्वामी स्टेडियम, चेन्नई


दुसरी कसोटी - 24 ते 28 ऑक्टोबर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे


तिसरी कसोटी - 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर, वानखेडे स्टेडियम, मुंबई


असा असेल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठीचा भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप


राखीव खेळाडू -
हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा