U-19 World Cup 2022 : टीम इंडियाची घोषणा, पाचव्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज
14 जानेवारीपासून वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे
U-19 World Cup 2022 : वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर-19 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने यश धुलच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. १४ जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतीय युवा संघ पांचव्यांदा विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचे विजेतेपद जिंकलं होते. त्यानंतर 2020 मध्ये प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती, पण बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
बीसीसीआयने रविवारी भारतीय संघाची घोषणा केली. दिल्लीचा यश धुल टीम इंडियाची धुरा सांभाळेल. याआधी दिल्लीच्या विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांनीही अंडर-19 विश्वचषकात भारताचं नेतृत्व केले आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावलं होतं. हा वारसा यश धुल पुढे चालवणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण भारतीय संघ सध्या बंगळुरू इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव शिबिरात सहभागी होत आहे. विश्वचषकापूर्वी संघ यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घेणार आहे.
U-19 World Cup 2022 साठी भारतीय संघ
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. एसके रशीद संघाचा उपकर्णधार असेल.
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंह, अंगकृष रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधु, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्य यादव (विकेटकीपर), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, वासु वत्स, विकी ओस्टवाल, रविकुमार, गर्व सांगवान.
राखीव खेळाडू - रिषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंह राठौड
भारत ग्रुप बी मध्ये
अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झालेअसून चार गट तयार करण्यात आले आहेत. भारतीय संघाचा ब गटात समावेश करण्यात आले आहे. भारता शिवाय या गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा या संघाचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीगच्या टप्प्यात खेळतील. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर दुसरा सामना 19 जानेवारीला आयर्लंडशी आणि शेवटचा साखळी सामना 22 जानेवारीला युगांडासोबत आहे.
पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज
अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. 1988 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने तब्बल 4 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. 2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्यांदा यश मिळाले. यानंतर 2008 मध्ये विराट कोहली, 2012 मध्ये उन्मुक्त चंद आणि 2018 मध्ये पृथ्वी शॉने देशाला विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघ 2016 आणि 2020 मध्ये उपविजेता ठरला होता. आता पाचव्या विजेतेपदासाठी टीम इंडिया पुन्हा सज्ज झाली आहे.