२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, या दिवशी होणार महामुकाबला
२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
कोलकाता : २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. १६ जूनला भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपचा महामुकाबला रंगणार आहे. असं असलं तरी २०१९ वर्ल्ड कपचा पहिला सामना भारत दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे. ५ जूनला ही मॅच होणार आहे. २०१९चा वर्ल्ड कप ३० मे ते १४ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. आणि आयपीएल २९ मार्च ते १९ मे या कालावधीत असेल. याआधी २ जूनला ही मॅच होणार होती. पण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये १५ दिवसांचं अंतर असणं बंधनकारक आहे, असा नियम लोढा समितीनं बनवला आहे. त्यामुळे भारत- दक्षिण आफ्रिकेचा सामना २ दिवसांनी पुढे ढकलण्यात आला. कोलकात्यामध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारताचा कधीच पराभव नाही
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा एकदाही पराभव झालेला नाही. आत्तापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या ६ पैकी ६ मॅचमध्ये भारताचा विजय झालेला आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी भारत मैदानात उतरेल.
याआधीच्या दोन आयसीसी स्पर्धांना भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यांनी सुरुवात झाली होती. २०१५च्या वर्ल्ड कपवेळी ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेडमध्ये आणि २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये भारत-पाकिस्तानचे सामने झाले होते. यंदा मात्र भारत-पाकिस्तानमध्ये पहिला सामना होणार नाही. १९९२ साली झालेल्या वर्ल्ड कपप्रमाणे २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या टीम एकमेकांविरोधात खेळणार आहेत.