भारताचा सामना तगड्या इंग्लंडशी, या खेळाडूंना संधी मिळणार?
भारताच्या इंग्लंड दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये उद्या पहिली टी-२० मॅच रंगणार आहे.
लंडन : भारताच्या इंग्लंड दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये उद्या पहिली टी-२० मॅच रंगणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत इंग्लंडविरुद्ध ३ टी-२०, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. टी-२० सीरिजआधीच भारताला मोठा धक्का लागला. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे टी-२० सीरिजला मुकणार आहेत. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० वेळी बुमराहच्या अंगठ्याला दुखापत झाली. स्कॅनिंगनंतर बुमराहचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. वनडे सीरिजसाठी बुमराह फिट होईल अशी आशा भारतीय टीमला आहे. तर फूटबॉल खेळताना वॉशिंग्टन सुंदरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तोही टी-२० सीरिजमधून बाहेर झाला आहे.
जसप्रीत बुमराहऐवजी दीपक चहरची टी-२० तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कृणाल पांड्याला संधी देण्यात आली आहे. वनडे सीरिजमध्ये अक्सर पटेलची निवड करण्यात आली आहे. आयर्लंडविरुद्धची टी-२० सीरिज भारतानं २-०नं अगदी सहज जिंकली. आता मात्र तगड्या इंग्लंडविरुद्धची कठीण परीक्षा भारताला द्यावी लागणार आहे.
हे खेळाडू मैदानात उतरणार?
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, सुरेश रैना, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव