`धोनीची बॅटिंग न आल्याने `रांची`कर नाराज पण...`
धोनीची फलंदाजी पाहता न आल्याने चाहते निराश होतील पण भारताच्या विजयाने आनंदात भर पडली असेल असे धवन म्हणाला.
रांची : ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या टी -20 सामन्यात पावसाचा व्यत्यय झाल्यानंतरही टीम इंडियाने ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला. धावसंख्या खूप मोठी असती तरीही आम्ही ती पार करु शकलो असतो असे भारतीय सलामीवीर शिखर धवन याने सामन्यानंतर सांगितले.
पावसाच्या व्यत्ययामुळे १८.४ षटकात ८ विकेट्सच्या बदल्यात ऑस्ट्रेलियाने ११८ धावा केल्या.डक वर्थ लुईस नुसार भारतासमोर ६ षटकात ४८ धावांचे सुधारित लक्ष्य होते. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धवन म्हणाला, "आमच्याकडे फारसे मोठे लक्ष्य नव्हते परंतु विकेट असल्याने धावा करणे सोपे होते. जरी आमच्यासमोर मोठे टार्गेट असते तरीही आम्ही जिंकलो असतो असेही त्याने सांगितले. टार्गेट छोटे असल्याने जास्त खेळण्याची वेळ आली नाही पण कोहलीने आक्रमक खेळी केली. वनडे सिरीजमध्ये बाहेर राहील्यानंतर मला टी २० सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी असल्याचेही धवनने सांगितले.
लक्ष छोटे असल्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याचा खेळ पाहण्यासाठी शहरातील चाहत्यांनी स्टेडियमवर मोठी गर्दी होती. याविषयीही धवनला विचारण्यात आले. 'सहा षटकांच्या खेळात किती बॅट्समन बॅटिंग करणार ? धोनीची फलंदाजी पाहता न आल्याने चाहते निराश होतील पण भारताच्या विजयाने त्यांच्या आनंदात भर पडली असेल असे धवन म्हणाला.गेल्या काही दिवसात भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात असून एक वेळच्या ऑस्ट्रेलियन संघासारखी उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्य बनत असल्याबद्दलही त्याला विचारण्यात आले.जर आम्ही तशी कामगिरी करू शकलो तर ते चांगलेच असेल.आम्ही त्या दिशेने जात असून खेळाडूही परिपक्व होत असल्याचे त्याने सांगितले.