India Vs Australia Big Shock To Team India: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. बॉर्डर-गावसकर चषक मालिकेतील काही सामन्यांमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अचानक रोहित शर्मा माघार का घेत आहे यासंदर्भातील माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच दिली आहे. 


...म्हणून रोहितची माघार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पात्र होण्यासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका फार महत्वाची  आहे. या मालिकेत भारतीय संघ एकूण पाच कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील कामगिरीवरच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. असं असतानाच आता भारतीय संघाबरोबर किमान पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा सोबत नसेल असं सांगण्यात आलं आहे. रोहित शर्मा काही वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या अती महत्त्वाच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने खेळणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत रोहित शर्माने अधिकृपणे कोणतीही घोषणा केलेली नसली तरी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र यासंदर्भातील तपशील दिला आहे.


बोर्डाला कळवलं


बीसीसीआयमधील सूत्रांनी रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. "भारतीय संघ नोव्हेंबरच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत 5 कसोटी सामने खेळणार आहे. पण रोहित या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे आम्हाला समजले आहे. रोहित शर्माने वैयक्तिक कारणास्तव आपल्याला पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याचं बोर्डाला कळवलं आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे," असं सूत्रांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलिया दौरा हा भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीचा शेवटचा कसोटी दौरा असणार आहे.


रोहितच्या जागी कर्णधार कोण?


22 नोव्हेंबरपासून भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यामधून रोहित शर्माने माघार घेतल्याचे समजते. त्यामुळे आता संघ व्यवस्थापनासमोर पहिला प्रश्न रोहितच्या जागी भारताचा कर्णधार कोण असणार? हा आहे. रोहितच्या ऐवजी भारतीय संघाची धूरा पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोण सांभळणार याची उत्सुकता सर्वांना आहे.


भारताच व्यस्त शेड्यूल


भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारत दोन कसोटी मालिका खेळणार आहे. यापैकी पहिली कसोटी मालिका भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होत असून या मालिकेत तीन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेनंतर भारताचा संघ हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.