मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचच्या आधी भारतीय टीमनं जोरदार सराव केला. भारतीय टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा सराव करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सराव करून दमलेला अजिंक्य रहाणे बसला आहे. तर एक मुलगी त्याला 'रहाणे दादा' असा आवाज देते. रहाणेनंही तिच्याकडे पाहत तिला हात दाखवला आहे. अजिंक्य रहाणे हा एक नम्र व्यक्ती आहे. सराव संपल्यानंतर रहाणेनं बाटल्या आणि कचरा उचलून ठेवला. आम्हाला तुझा अभिमान आहे, असं या मुलीनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली ४ टेस्ट मॅचची सीरिज सध्या १-१नं बरोबरीत आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला, तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला १४६ रननी पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या टेस्टमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम सीरिज गमावणार नाही. 


तिसऱ्या टेस्टसाठी भारतानं टीममध्ये बदल केले आहेत. वारंवार अपयशी ठरत असलेल्या ओपनर केएल राहुल आणि मुरली विजयला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. या दोघांऐवजी मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी या मॅचमध्ये ओपनिंगला येतील, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. याचबरोबर दुसऱ्या टेस्टमध्ये खेळलेल्या उमेश यादवऐवजी स्पिनर ऑलराऊंडर रवींद्र जडेजाचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.


द्विशतक करू शकतो


रहाणेनं या सीरिजच्या २ टेस्टमध्ये २ अर्धशतकांच्या मदतीनं १६४ रन केले आहेत. मागच्यावर्षी कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक केल्यानंतर रहाणेला शतक करता आलेलं नाही. ऍडलेड टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रहाणेनं ७० आणि पर्थ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ५० रन केले होते.


मी सध्या ज्या लयीमध्ये बॅटिंग करत आहे ते पाहता मेलबर्नमध्ये होणाऱ्या टेस्टमध्ये मी द्विशतकही करु शकतो, असं रहाणे म्हणाला. २०१४ साली मेलबर्नमध्ये रहाणेनं शतक केलं होतं. त्या मॅचमध्ये विराट कोहलीनंही एक शतक आणि एक अर्धशतक केलं होतं.