ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये २१ नोव्हेंबरपासून क्रिकेटच्या रणांगणात युद्ध रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी-२० ची पहिली लढत ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर रंगणार आहे. या खडतर मालिकेची सुरुवात विजयानं करण्याच्या इराद्यानं कोहली एँड कंपनी मैदानात उतरेल. तर सध्या बिकट परिस्थितीतून जात असलेल्या कांगारुंसमोर विजय साकारत आपली प्रतिष्ठा पुन्हा जपण्याचं आव्हान असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला भारतीय क्रिकेट संघ ३ टी-२०, ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या खडतर दौऱ्याची सुरुवात टी-२० सीरिजनं होणार आहे. ऑस्ट्रेलियातील अखेरच्या दौऱ्यात भारतानं कांगारुंना टी-२०मध्ये त्यांच्याच भूमीत ३-०नं नमवण्याची किमया केली होती. याखेरीज गेल्या ७ टी-२० सीरिजमध्ये भारतीय क्रिकेट संघ अपराजित राहिलाय.


विंडीजविरुद्ध टी-२० सीरिजमध्ये विश्रांती घेतलेला भारताचा आक्रमक कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीचं संघात पुनरागमन झाल्यानं भारतीय संघ नक्कीच ताकदवान झालाय. शिखर धवन, रोहित शर्मा आणि रिषभ पंतसारखे स्फोटक फलंदाज आपल्याकडे आहेत. तर कांगारूंच्या नाथन कूल्टर नाईल आणि एंड्रयू टाई यांचा मुकाबला आपल्या फलंदाजांना करावा लागणार आहे.


दरम्यान मधल्या फळीत के. एल राहुलच्या मानानं दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतनं आपल्या कामगिरीत सातत्य दाखवलंय. यामुळे यापैकी कुणाला संधी जाते हे पहावं लागेल. तर भुवेश्वर कुमार, जसप्रित बुमराह आणि खलील अहमद या त्रिकुटावर ऑसी खेळपट्ट्यांवर दर्जेदार वेगवान मारा करावा लागणार आहे.


तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेरही कठीण परिस्थितीतून जात आहे. चेंडू कुरतडल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी लादण्यात आलेला त्यांचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळणार नाहीत. याखेरीज कॅमरॉन बॅनक्रॉफ्टही खेळणार नसल्यानं कांगारुंना याचा नक्कीच फटका बसणार आहे.


स्टिव स्मिथ आणि डेविड वॉर्नरच्या गैरहजेरी एरॉन फिंचच्या नेतृत्त्वाचा कस लागणार आहे. या खेळाडूंवर बंदी लादण्यात आल्यापासून ऑस्ट्रेलियाला इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलाय. आता भारत विजयी सलामी देतो की ऑस्ट्रेलिया विजयाची पताका फडकावतो याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.