मोहाली : भेदक आणि अचूक बॉलिंगसाठी ओळखला जाणाऱ्या बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये त्याच्या बॅटनंही कमाल दाखवली. बुमराहच्या या कामगिरीमुळे भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून बॅटिंग करण्यासाठी आलेल्या भारताची सुरुवात धमाकेदार झाली. पण रोहित-शिखरची सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर भारताने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. भारताला युजवेंद्र चहलच्या रुपात नववा झटका लागला. त्यावेळी भारताचा स्कोअर ४९.५ ओव्हरमध्ये ९ बाद ३५२ असा होता. शेवटचा बॉल खेळण्यासाठी जसप्रीत बुमराह मैदानात आला आणि त्याने लॉन्ग ऑनच्या दिशेनं सिक्स मारला. यामुळे भारताचा स्कोअर ५० ओव्हरमध्ये ३५८ रन एवढा झाला. 


ड्रेसिंगरुममध्ये असलेल्या विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी बुमराहच्या या सिक्ससाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. बुमहारच्या या फटक्यामुळे ड्रेसिंगरुममधील वातावरण आनंदमयी झालेलं पाहायला मिळालं.


बुमराहच्या या सिक्सने सर्वांनाच सुख:द धक्का दिला. आपण सिक्स मारला आहे, यावर बुमराहला देखील काहीवेळ विश्वास बसत नव्हता. बुमराहला स्वत:वर आलेले हसू आवरता आले नाही. शेवटच्या बॉलवर सिक्स मारल्याने बुमराहचा स्ट्राइक रेट हा ६०० झाला. बुमराहच्या कारकिर्दीतील हा पहिलाच सिक्स ठरला आहे. विशेष म्हणजे या मॅचमध्ये पाच विकेट घेतलेल्या पॅट कमीन्सच्या बॉलिंगवर बुमराहनं सिक्स लगावला.


बुमराहची आंतरराष्ट्रीय कामगिरी


ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली चौथी वनडे मॅच ही बुमराहच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतली १०० वी मॅच ठरली. बुमराहने आतापर्यंत ४८ वनडे, ४२ टी-२० आणि १० टेस्ट मॅच खेळल्या आहेत. प्रत्येक खेळाडूला आपल्या १०० व्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी असं वाटतं. जेणेकरुन ती खेळी आणि मॅच अविस्मरणीय रहावी. बुमराहने मारलेल्या सिक्समुळे क्रिकेट चाहत्यांना आणि स्वत: बुमराहला देखील ही १०० वी मॅच निश्चितपणे आठवणीत राहिल.


भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३५९ रन्सचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ४७.५ ओव्हर मध्ये ६ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. यावेळी बुमराहने मात्र चांगली बॉलिंग केली. त्याने ८.५ ओव्हरमध्ये ६३ रनच्या मोबदल्यात ३ विकेट मिळवल्या. चौथ्या मॅचमध्ये झालेल्या विजयामुळे ऑस्ट्रेलियानं ५ मॅचच्या सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे बुधवारी १३ तारखेला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणारी अखेरची मॅच रंगतदार ठरणार आहे.