India vs Australia 3rd Test Day 4: भारताचा विजय लांबणीवर
कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिसरा सामना अतिशय रंजक वळणावर आला आहे.
मुंबई : मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये सुरु असणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिसरा सामना अतिशय रंजक वळणावर आला आहे. या सामन्याच्य़ा चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीचा मारा पाहता भारताचा विजय जवळपास निश्चित होता.
पण, आठ गडी तंबूत परतल्यानंतर पॅट कमिन्सने अतिशय संयमी खेळी करत भारताचा विजय लांबणीवर नेला आहे. त्यामुळे या सामन्याचा पाचवा दिवस खऱ्या अर्थाने उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.
कमिन्सने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ८ बाद, २५८ इतक्या धावा केल्या असून, विजयासाठी त्यांना १४१ धावांची आवश्यकता आहे. नाथन लिओन आणि पॅट कमिन्स हे बिनबाद खेळत आहेत. त्यामुळे कमिन्सची पकड बाहता भारताच्या विजयात त्याने चांगलंच आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यत कमिन्सची ही सर्वाधिक चांगली कामगिरी ठरत आहे.
मेलबर्नमध्ये सुरू असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी दोन्ही संघांच्या वाट्याला प्रत्येकी १-१ विजय होता. पण, तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारतीय खेळाडूंची प्रशंसनीय कामगिरी पाहायला मिळाली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, पदार्पणातच क्रीडारसिकांची मनं जिंकणाऱ्या मयंक अग्रवाल या फलंदाजांच्या आणि जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शामी या गोलंदाजांच्या बळावर भारतीय संघाला विजयाच्या अधिक जवळ नेऊन ठेवलं.
भारताने दुसरा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी आला. पहिल्या डावात ८ धावांवर बाद झालेला सलामीवीर फिंच दुसऱ्या डावाततही अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कुठे संयमी खेळी करत संघाची धावसंख्या सावरण्याच्या प्रयत्नांत होते, तोच बुमराहच्या भेदक माऱ्याने त्यांना अखेर अपयश पत्करावं लागलं. ख्वाजा, शॉन मार्श, टेविस हेड यांनी काही चेंडूंवर आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत धावसंख्येत भर टाकली. पण, अखेर त्यांनाही भारतीय गोलंदाजांनी तंबूत परत पाठवलं. चहापानानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडबडला आणि एक- एक करत सर्वच खेळाडूंनी विकेट देत, भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण, दिवसअखेर कमिन्सच्या फलंदाजीमुळे चौथा दिवस आणि पर्यायी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सुधारली.