कोलकाता : कोलकात्यामध्ये खेळवण्यात येणारी ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट आणखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा १०६ रनवर ऑलआऊट झाला आहे. खरं तर क्रिकेटमध्ये ऑलआऊट होणं म्हणजे १० विकेट जाणं, पण या मॅचमध्ये बांगलादेशला १२ झटके लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये लिटन दास आणि नईम हसन यांना दुखापत झाली. या दोन्ही खेळाडूंच्या डोक्याला बॉल लागला आहे, त्यामुळे दोन्ही खेळाडू उरलेल्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाहीत. लिटन दास हा २४ रनवर रिटायर्ड हर्ट झाला. लिटन दासच्याऐवजी मेहदी हसन बॅटिंगला आला. मेहदी हसन ८ रनची खेळी करुन आऊट झाला. तर दुखापत झाल्यानंतरही नईम हसन खेळत राहिला, अखेर १९ रनवर हसन आऊट झाला. 


आता उरलेल्या टेस्ट मॅचमध्ये लिटन दासच्याऐवजी मेहदी हसन आणि नईम हसनच्याऐवजी तैजुल इस्लाम कनकशन खेळाडू म्हणून बांगलादेशच्या टीममध्ये आले आहेत. आयसीसीच्या नव्या नियमानुसार मॅच सुरु असताना एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याच्याऐवजी दुसरा खेळाडू उरलेली मॅच खेळू शकतो. 


बांगलादेशचा फक्त १०६ रनवर ऑलआऊट झाला. यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर १७४/३ एवढा झाला आहे. त्यामुळे भारताला ६८ रनची आघाडी मिळाली आहे. दिवसाअखेरीस विराट कोहली ५९ रनवर नाबाद आणि अजिंक्य रहाणे २३ रनवर नाबाद आहेत.


बांगलादेशचा पहिल्या इनिंगमध्ये लवकर ऑलआऊट झाल्यानंतर भारतालाही सुरुवातीला धक्के बसले. मयंक अग्रवाल १४ रनवर आणि रोहित शर्मा २१ रनवर आऊट झाले. पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर पुजारा आणि विराटने भारताचा डाव सावरला. चेतेश्वर पुजारा ५५ रन करुन आऊट झाला. बांगलादेशच्या एबादात हुसेनला २ आणि अल अमीन हुसेनला १ विकेट मिळाली आहे.


बांगलादेशला १०६ रनवर ऑलआऊट करण्यात इशांत शर्माने सगळ्यात मोठी भूमिका बजावली. इशांत शर्माने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या आहेत. तर उमेश यादवला ३ आणि मोहम्मद शमीला २ विकेट मिळाल्या.


भारत हा पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये हा सामना सुरु आहे. डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे नेहमीच्या लाल बॉलऐवजी गुलाबी बॉलने ही मॅच खेळवली जात आहे.