टीम इंडियाचा पराभव, इंग्लंडने दुसरी वन-डे जिंकली
लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
लंडन : टीम इंडियाने पहिला वन-डे सामना सहज जिंकला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली. ८६ धावांनी टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे वन-डे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसऱ्या सामन्याकडे लक्ष लागले आहे. हा सामना जो जिंकेल तो मालिका खिशात टाकणार आहे. या मालिकेतला अंतिम सामना मंगळवारी हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
इंग्लंडने टीम इंडियापुढे ३२३ धावांचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरा वन-डे सामना इंग्लंडने ८६ धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. टीम इंडियाकडून सुरेश रैना आणि विराट कोहलीने चौथ्या विकेटसाठी केलेली ८० धावांची भागीदारी सर्वोत्तम ठरली. याव्यतिरीक्त एकही भारतीय फलंदाज आपली छाप पाडू शकला नाही. धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे कारकिर्दीत दहा हजार धावांचा टप्पा पार केला. मात्र त्याला दुसऱ्या कोणत्याही खेळाडूने साथ दिली नाही.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन करत भारतीय फलंदाजीला लगाम लावला. लियाम प्लंकेटने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर त्याला आदिल रशिद व डेव्हिड विलीने प्रत्येकी २ आणि मोईन अली, मार्क वूड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.
इंग्लंडने सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात इंग्लंडने ७ गडी गमावत ३२२ धावा केल्या. जो रुटने या सामन्यात नाबाद ११३ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने आपल्या डावाची सुरुवात अतिशय सावध पद्धतीने केली. यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही अतिशय संयमीपणे भारतीय गोलंदाजीचा सामना करत तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची शतकी भागीदारी रचली.
दरम्यान अखेरच्या षटकात डेव्हिड विलीने झटपट धावा जमवत अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात विली धोनीच्या अचून फेकीवर धावबाद झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधीक ३, तर उमेश यादव, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.