Ind vs Eng Test: `असलं काही मी कधीच पाहिलेलं नाही,` चौथ्या कसोटी सामन्याआधी बेन स्टोक्सचं मोठं विधान
Ind vs Eng Test: भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ची आघाडी घेतली आहे. शुक्रवारपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून, त्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) खेळपट्टी तपासली. यानंतर त्याने आपण याआधी कधीच असं काही पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Ind vs Eng Test: भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने रांचीमधील खेळपट्टी तपासली. यानंतर त्याने आपण याआधी असं काही कधीच पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. बेझबॉल खेळणाऱ्या इंग्लंड संघावर भारतीय संघ भारी पडत असून, हा सामना जिंकत इंग्लंडची बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल.
बेन स्टोक्सने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, रांचीमधील खेळपट्टीचे स्वरूप फार फसवं वाटत आहे. कारण खेळपट्टी लांबून पाहिली असता त्यावर गवताचे आच्छादन दिसत आहे. पण जवळ जाऊन पाहणी केल्यानंतर त्यावर अनेक ठिकाणी तडे दिसत आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज अशा दोघांसाठी आव्हानात्मक असेल.
"मी असं काही याआधी कधी पाहिलेलं नाही. मला काहीच कल्पना येत असून, नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. जर तुम्ही विरुद्ध टोकाची एक बाजू पाहिली तर ती मी आतापर्यंत आणि खासकरुन भारतात पाहिलं आहे त्यापेक्षा ती वेगळी दिसली. चेंजिंग रुममधून खेळपट्टी हिरवी आणि गवत असल्याचं दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही जवळ जाऊन पाहता तेव्हा ती फार गडद आणि थोडेफार तडे गेलेली आहे," असं बेन स्टोक्सने बीबीसी स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहू शकतं. याचं कारण या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. हैदराबाद, विशाखापट्टणम आणि राजकोट येथील मैदानं फक्त फिरकीपटूंना अनुकूल नव्हती. येथे जलदगती गोलंदाजांनाही तितकीच मदत मिळत होती.
"जर चेंडू पहिल्या ओव्हरपासून फिरत असेल तर नाणेफेक कोणी जिंकलं याने फरक पडत नाही. ते एक समान खेळाचे क्षेत्र आहे," असं उपकर्णधार ओली पोपने म्हटलं आहे. "आम्ही पहिला सामना प्रथम फलंदाजी करून जिंकला, तर शेवटच्या दोन सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. चपळ विकेटवर तुम्ही प्रथम फलंदाजी केली तर त्याचा निकाल निश्चित होत नाही, पण तो तुम्हाला फायदेशीर नक्की ठरतो," असं बेन स्टोक्सने सांगितलं आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
इंग्लंडची संभाव्य प्लेईंग 11
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, गस ऍटकिन्सन.