भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली; दिवसअखेर भारत ६ बाद १७४
भारतीय संघाची सुरुवात फारशी आश्वासक झाली नाही.
लंडन: भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीचा दुसरा दिवस टीम इंडियासाठी फारसा फलदायी ठरताना दिसत नाही. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात अपयश आले. त्यामुळे पहिल्या दिवसाखेर 7 बाद 198 धावसंख्या असलेल्या इंग्लंडने ३३२ धावांपर्यंत मजल मारली.
यानंतर फलंदाजासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी आश्वासक झाली नाही. भारताने चहापानापर्यंत १ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली असून यासाठी भारतीय फलंदाजांनी १८ षटके घेतली. भारताला शिखर धवनच्या रूपात पहिला धक्का ६ धावांवर बसला. धवन ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर राहुल-पुजारा जोडीने भारताला अर्धशतकी धावसंख्या गाठून दिली. हे दोघे स्थिरावले असे वाटत असतानाच कुर्रानने लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर पुजाराही झेलबाद झाला. यापाठोपाठ उपकर्णधार अजिंक्य राहणेही भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने ४९ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमबॅक करत ५ बळी टिपले. त्यापैकी अँडरसन आणि स्टोक्सने २-२ तर ब्रॉड आणि कुर्रानने १-१ बळी टिपला. सध्या हनुमा विहारी २५ तर जडेजा ८ धावांवर खेळत आहे.