`जर तुम्हाला...`, BCCI-स्थानिक क्रिकेट वादावर रोहितने स्पष्ट केली भूमिका; `हेच मूळ आहे`
India vs England Test: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय विरुद्ध स्थानिक क्रिकेट असा वाद रंगला आहे. जर खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळले नाहीत तर त्यांचा राष्ट्रीय संघासाठी विचार केला जाणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यातच आता कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे.
India vs England Test: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय विरुद्ध स्थानिक क्रिकेट असा वाद रंगला आहे. स्थानिक क्रिकेट खेळण्यात रस न दाखवणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर बीसीसीआयने कारवाईचा बडगा उगारला असून, वार्षिक करारातून वगळलं आहे. यानंतर आजी-माजी खेळाडूंकडून यावर मत व्यक्त केलं जात आहे. अनेकांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुळे स्थानिक क्रिकेटचं महत्व जपलं जाईल असं म्हटलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेटवर भाष्य केलं आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये 7 मार्चपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेट खेळण्याच्या अटीवर आपलं मत मांडलं. तो म्हणाला की, "जर वैद्यकीय पथकाने प्रमाणपत्र दिलं नसेल तर खेळाडूंनी स्थानिक क्रिकेट खेळायला हवं. हे महत्वाचं आहे. हे प्रत्येकासाठी आहे. मी मुंबई विरुद्ध तामिळनाडू सामना पाहिला. स्थानिक क्रिकेटला महत्त्व दिलंच पाहिजे. ते भारतीय क्रिकेटचं मूळ आहे".
दरम्यान युवा खेळाडू रजत पाटीदार या मालिकेत आपली छाप पाडू शकलेला नाही. त्याने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत. रोहितने त्याच्या कामगिरीवर बोलताना अजून थोडा वेळ दिला पाहिजे असं म्हटलं आहे. "रजत पाटीदार अपेक्षेप्रमाणे खेळू शकलेला नाही. त्याने अपेक्षा होत्या तितक्या धावा अद्याप केलेल्या नाहीत. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या धावा केल्या होत्या. पण त्याला इथे संधीचं सोनं करता आलेलं नाही. पण करिअरच्या सुरुवातील अशा गोष्टी होत असतात. त्याच्यावर अंतर्गत दबाव येऊ नये ही आमची जबाबदारी आहे," असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
शार्दूल ठाकूरचा बीसीसीआयला सल्ला
एकीकडे बीसीसीआय स्थानिक क्रिकेटसाठी आग्रही असताना मुंबईकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरने व्यग्र वेळापत्रकावरुन नाराजी जाहीर केली आहे. "बाद फेरीत संघ पोहोचत असताना केवळ तीन दिवसांच्या विश्रांतीने एवढे सामने खेळायला लागणं बरोबर नाही. रणजी ट्रॉफीत असं याआधी कधी झालेलं नाही. खेळाडूंना इतक्या व्यग्र कार्यक्रमाशी जुळवून घेणं जिकरीचं जातं. असं यापूर्वी कधी झालं नव्हतं," असं शार्दूल ठाकूरने म्हटलं आहे.
जर खेळाडू अशाच प्रकारे आणखी दोन हंगाम खेळत राहिले तर दुखापतग्रस्त होतील अशी भीतीही त्याने व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, "क्रिकेटचा व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता बीसीसीआयने पुन्हा एकदा याचा विचार केला पाहिजे. तसंच खेळाडूंना जास्त विश्रांती देण्याची गरज आहे. अशाच पद्धतीने खेळाडूंना आणखी दोन हंगाम खेळावे लागले तर थकण्यापेक्षा दुखापतींच्या तक्रारी जास्त वाढतील".
शार्दूल ठाकूरने यावेळी आपल्यावेळी काय स्थिती होती हे सांगताना म्हटलं की, "माझ्या वेळचं सांगायचं झालं तर 7-8 वर्षांपूर्वी 3 सामन्यात 3-3 दिवसांचा ब्रेक असायचा. दोन सामन्यात 7 ते 8 दिवसांची विश्रांती मिळत होती. बाद फेरीत पाच दिवसांचा वेळ मिळत असे, आता क्रिकेटपटूंना प्रत्येक सामना 3 दिवसांनी खेळावा लागत आहे. जर एखादा संघ अंतिम सामन्यात पोहोचला तर खेळाडूंना 3-3 दिवसांच्या अंतराने 10 सामने खेळणं फार कठीण होईल. त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणंही अर्थहीन आहे". तसंच इतक्या व्यग्र वेळापत्रकात एखादा जलगदती गोलंदाज जखमी झाला तर त्याला त्यातून बाहेर पडण्यास फार वेळ लागतो असंही त्याने म्हटलं.