लॉर्ड्स : आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनलमध्ये भारताची लढत तीन वेळची वर्ल्ड चॅम्पियन टीम इंग्लंडशी होणार आहे. कागदावर यजमान इंग्लिश टीम मजबूत आहे. मात्र, वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमची कामगिरी पाहता आणि सेमी फायनलमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन कांगारुंना दिलेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे मिथालीची टीमही विजयासाठी फेव्हरेट असेल. कांगारुंना पराभूत करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणा-या हरमनप्रीत कौरकडूनही मोठ्या अपेक्षा असतील.


आपल्या क्रिकेट करिअरमधील तिनं सर्वोत्तम इनिंग खेळली होती. त्यामुळे या मॅचमध्येही तिच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल. भारतीय टीमची बॅटिंगमध्ये मदार ही कॅप्टन मिथाली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती आणि दीप्ती शर्मावर असेल. तर  झुलन गोस्वामी, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादववर बॉलिंगची भिस्त असेल. भारताला सर्वाधिक धोका हा इंग्लंडच्या टॅमी बीओमोंट, हिदर नाईट आणि सारा टेलर कडून असेल. या तिघी वर्ल्ड कपमध्ये र्वाधिक रन्स करणा-यांच्या यादीत पहिल्या पाच बॅट्समनमध्ये आहेत.


इंग्लंड होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांना  होम अॅडव्हान्टेज मिळेल. मात्र, आत्मविश्वास उंचावलेली भारतीय टीम ऐतिहासिक विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहे. लॉर्ड्सवर होणा-या या लढतीमध्ये मिथाली राजची टीम आपलं सर्वस्व पणाला लावेल यात शंकाच नाही. 2005 मध्ये भारतीय टीमचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न धुळी मिळालं होतं. मात्र, बारा वर्षांनी वर्ल्ड कप फायनल गाठलेली भारतीय टीम आता करोडो भारतीयांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असेल.