मुंबई : भारतीय टीम आशिया कप-2018 मध्ये आज हाँगकाँग विरोधात पहिला सामना खेळणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यामध्ये टीमच्या कॉम्बिनेशनबाबत चिंतेत आहे. रोहितने सोमवारी म्हटलं की, टीममधील मीडल ऑर्डर अजूनही व्यवस्थित नाही. अशावेळी रोहित शर्मा आशिया कपमध्ये चौथ्या आणि सहाव्या स्थानी कोणाला संधी द्यायची याबाबत नक्कीच विचार करत असेल. भारताचा पुढचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील एक वर्षात भारताला मीडल ऑर्डरने खूप निराश केलं आहे. इंग्लंड विरोधात वनडे सीरीजमध्ये ही हीच गोष्ट समोर आली. रोहितने स्पष्ट केलं आहे की, मनीष पांडे, केदार जाधव आणि अंबती रायडू यांच्यामध्ये मीडल ऑर्डरसाठी स्पर्धा आहे.


त्याने म्हटलं की, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या स्थानी कोणाला खेळवायचं याबाबत विचार सुरु आहे. केदार, मनीष आणि रायडू या जागी किती फीट बसतात याबाबत विचार सुरु आहे. या सीरीजमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचं देखील रोहितने म्हटलं आहे.


रोहितने म्हटलं की, 'केदार आणि रायडू टीमचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. पण दुखापतीमुळे त्यांना खेळता नाही आलं. पण आता या दोघांची वापसी झाली आहे. ये दोघे खेळाडू भारतासाठी चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुढेही संधी मिळेल. प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या परिस्थितीत कशी कामगिरी करतो हे देखील पाहावं लागणार आहे.'