ख्राईस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धच्या ख्राईस्टचर्च येथील कसोटीत सोमवारी भारताचा दारूण पराभव झाला. न्यूझीलंडने सात गडी राखून आरामात हा कसोटी सामना खिशात टाकला. त्यामुळे भारतीय संघावर एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही व्हाईटवॉश स्वीकारण्याची नामुष्की ओढावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १३२ धावांचे आव्हान ७ गडी राखत पूर्ण केले. या संपूर्ण कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. याउलट न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या डावातही सहजपणे भारतीय गोलंदाजांचा सामना केला. न्यूझीलंडच्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.  लॅथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक सातत्याने हलता ठेवला. न्यूझीलंडने शतकी धावसंख्या ओलांडल्यानंतर लॅथम आणि टॉम ब्लंडल हे दोघेही बाद झाले. मात्र, तोपर्यंत हा सामना भारताच्या हातून निसटला होता.


तत्पूर्वी आज तिसऱ्या दिवशी भारताने ६ बाद ९० या धावसंख्येवरून सुरुवात केली. मात्र, आजही भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा सुमार कामगिरीचा कित्ता गिरवला. हनुमा विहारी टीम साऊदीच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाजही एकामागोमाग एक माघारी परतले. रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जसप्रीत बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव १२४ धावांमध्ये आटोपला. भारताच्या एकाही फलंदाजाला २५ पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. न्यूझीलंकडून ट्रेंट बोल्टने ४ आणि टीम साऊदीने तीन भारतीय फलंदाजांना माघारी धाडले.