नेपियर : ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवून भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारत ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. बुधवार २३ जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलरनं भारतीय खेळाडूंबद्दल भीती व्यक्त केली आहे. फक्त विराट कोहलीच नाही तर भारतीय संघाचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवनही धोकादायक असल्याचं रॉस टेलर म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाविरुद्ध रणनिती आखताना फक्त विराटच नाही तर रोहित आणि शिखरचाही विचार करावा लागेल, कारण हे दोन्ही खेळाडू तेवढंच नुकसान पोहोचवू शकतात, अशी प्रतिक्रिया रॉस टेलरनं दिली. कोहली हा जगातला सर्वोत्तम खेळाडू आहे याबद्दल शंकाच नाही. पण विराटआधी खेळायला येणारे भारताचे दोन्ही ओपनर रोहित आणि शिखर तेवढेच आक्रमक आहेत. या दोन्ही खेळाडूंची कामगिरीही चांगली झाली आहे. त्यामुळे फास्ट बॉलरना त्यांच काम चोख करावं लागेल, असं वक्तव्य टेलरनं केलं.


न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांनीही रोहित-शिखरची बॅटिंग न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरेल, अशी शक्यता वर्तवली आहे. भारताच्या आघाडीच्या बॅट्समनसाठी न्यूझीलंडला चोख रणनिती आखावी लागेल, असं माईक हेसन म्हणाले. रोहित शर्मा हा बऱ्याच कालावधीपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रोहित जेव्हा मैदानात टिकतो तेव्हा तो मोठी खेळी करतो आणि मॅचचा निकालच बदलवून टाकतो. त्यामुळे बॉल नवीन असतानाच स्विंग करून किंवा वेगळी रणनिती वापरून रोहितला लवकर माघारी पाठवावं लागेल, अशी प्रतिक्रिया माईक हेसन यांनी इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना दिली.   


ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा विजय झाला असला तरी न्यूझीलंडचा दौरा भारतासाठी एवढा सोपा असणार नाही. सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या संघापेक्षा न्यूझीलंडचा सध्याचा संघ नक्कीच तगडा आहे. शिवाय न्यूझीलंडचा संघ गेल्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विराटच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच कसोटी मालिका आणि द्विदेशीय एकदिवसीय मालिका जिंकली. त्यामुळे भारताचा आणि विराट कोहलीचा आत्मविश्वासही दुणावला असेल.