India vs New Zealand : सुपर ओव्हरआधी रोहित नेमका कशाच्या शोधात होता?
सुपर ओव्हर सुरु होण्याआधी मात्र.....
हॅमिल्टन : india vs New Zealand अशा दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. सुपरओव्हरपर्यंत या सामन्याचा थरार अनुभवता आला. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांच्यावर संघाने मोठी जबाबदारी सोपवली होती. अतिशय संयमी अशी खेळी करत निर्णयक षटकामध्ये रोहित शर्माने पुन्हा एकदा त्याच्या क्रिकेट कौशल्याची प्रचिती सर्वांनाच दिली.
सुपर ओव्हर सुरु होण्याआधी मात्र रोहितला एका भलत्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. सलामीवीर रोहित आणि के.एल. राहुल या दोघांनीही सुरुवातीलाच बाद झाल्यानंतर बॅटिंग किटमधील सर्व सामान आवरुन ठेवलं होतं. अखेरच्या क्षणी सामना सुपर ओव्हरपर्यंत जाईल आणि याच किटची पुन्हा गरज पडेल असा विचार त्यांच्याही मनात आला नव्हता. किंबहुना या सामन्यानंतर संघाला वेलिंग्टनच्या रोखाने निघायचं असल्याचाच विचार रोहितनेही केला होता.
वाचा : ....अपुनीच भगवान है; रोहित- शमीच्या खेळीवर सेहवागची अफलातून प्रतिक्रिया
अखेरच्या क्षणी सामना अनिर्णित राहिल्यामुळे, दोन्ही संघ मैदानातच थांबले. ज्यानंतर लगेचच सुपर ओव्हर घोषित करण्यात आली. रोहित आणि के.एल. पुन्हा मैदानात येण्यास सज्ज होत होते. ज्यासाठी त्यांनी ड्रेसिंग रुमची वाट धरली. के.एल. तयार होऊन मैदानात जाण्यास सज्ज असुनही रोहित मात्र एक गोष्ट शोधत राहिला होता. ती गोष्ट म्हणजे ऍबडोमन गार्ड.
सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना रोहितने याविषयीचा खुलासा केला. 'सर्वकाही बॅगेत भरलं होतं. मी सर्वच सामान बॅगेत भरलेलं. मला ते सारं बाहेर काढावं लागलं. मला त्यासाठी पूर्ण पाच मिनिटांचा वेळ लागला. कारण, ऍबडोमन गार्ड नेमकं कुठे ठेवलेलं हेच मला ठाऊक नव्हत', असं रोहित म्हणाला. सामना अशा प्रकारे सुपर ओव्हरपर्यंत जाईल याची आपल्याचा कल्पनाही नसल्याचं त्याने या पत्रकार परिषदेत सांगितलं.