वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. याआधी झालेला तिसरा सामनाही भारताने सुपर ओव्हरमध्येच जिंकला होता. सुपर ओव्हरच्या या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते दोन मुंबईकर खेळाडू. मुंबईकर शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा यांनी या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय खेचून आणला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या टी-२० मॅचमध्ये न्यूझीलंडला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ७ रनची गरज होती, पण शार्दुल ठाकूरने अचूक मारा करत अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करुन दाखवली. शार्दूल ठाकूरने २०व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रॉस टेलरला माघारी धाडलं. शार्दुल ठाकूरच्या दुसऱ्या बॉलला डॅरेल मिचेलने फोर मारली, यानंतर न्यूझीलंड सामना जिंकेल असं वाटत असतानाच तिसऱ्या बॉलला टीम सायफर्ट रन आऊट झाला.


शार्दुल ठाकूरच्या चौथ्या बॉलला मिचेल सॅन्टनरने एक रन काढली, तर पुढच्या बॉलला डॅरेल मिचेल आऊट झाला.  सहाव्या बॉलला २ रनची गरज असताना मिचेल सॅन्टनरने १ रन काढली, पण दुसरी रन घेताना तो आऊट झाला. यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली.


शार्दुल ठाकूरने ४ ओव्हरमध्ये ३३ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर बॅटिंग करतानाही शार्दुल ठाकूरने मनिष पांडेला चांगली साथ दिली. शार्दुल ठाकूरने आठव्या क्रमांकावर बॅटिंग करताना १५ बॉलमध्ये २० रन केले. या कामगिरीमुळे शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्येही निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. या मॅचमध्ये रोहित शर्माने भारताला शेवटच्या बॉलवर सिक्स मारून जिंकवून दिलं. तिसऱ्या मॅचच्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १८ रनचं आव्हान दिलं होतं.


सुपर ओव्हरच्या शेवटच्या २ बॉलवर भारताला विजयासाठी १० रनची गरज होती. रोहित शर्माने या दोन्ही बॉलवर सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. त्याआधी रोहित शर्माने ४० बॉलमध्ये ६५ रनची खेळी केली होती. या कामगिरीबद्दल रोहितला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तिसऱ्या मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला चौथ्या टी-२० मॅचसाठी विश्रांती देण्यात आली होती.