#IndiaVsPakistan : मँचेस्टरच्या स्टेडियममध्ये बाळासाहेब आणि मोदींचा डंका
त्यांचा मराठमोळा अंदाज विशेष गाजला
नवी दिल्ली : World Cup 2019 रविवारचा दिवस हा क्रीडारसिकांसाठी एक परवणीच ठरला. विश्वचषकाच्या यंदाच्या पर्वात हा दिवस खास होता, कारण होतं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला क्रिकेट सामना. सुरुवातीपासून शेवटपर्यंत किंबहुना सामना संपून काही तास उलटले असतानाही त्याविषयी होणाऱ्या चर्चा काही थांबलेल्या नाहीत.
मँचेस्टर येथे पार पडलेल्या या सामन्यात क्रीडारसिकांचीही विविध रुपं पाहा.ला मिळाली. कोणी देशांचे राष्ट्रध्वज फडकवत होतं, तर कोणी चेहऱ्यांवर याच ध्वजांचं प्रतिक रेखाटलं होतं. रंगीबेरंगी झिरमिळ्या, भोंगे आणि अशा नानापरिंच्या साहित्याने खऱ्या अर्थाने या सामन्याला चाहत्यांनी रंगत आणली.
मैदानावर या दोन्ही संघांमध्ये सामना रंगलेला असतानाच चाहत्यांमध्ये अशाच काहीजणांनी अनेकांचं लक्ष वेधलं. कारण ही मंडळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर घेऊन स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.
आगरी- कोळी संस्कृतीचं प्रतिक असणाऱ्या लाल रंगाच्या टोप्या घालून ही मंडळी अस्सल बाज दाखवत सामना पाहण्यासाठी आले होते.
ठाणे जिल्ह्यातील दिवा गावातील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर अशी या तिन्ही मंडळींची नावं आहे. हे इंगलंड येथे विश्वचषक पाहण्यासाठी गेले असता न्यूझीलंड विरुद्ध होणारा सामना पावसामुळे रद्द झाला होता, अखेर या प्रेक्षकांनी भारत- पाकिस्तान सामन्याचा मनमुराद आनंद लुटला आणि सामन्यादरम्यानचा त्यांचा अंदाज अनेकांचं लक्ष वेधून गेला.