नवी दिल्ली : World Cup 2019 रविवारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ओल्ड मँचेस्टर येथे पार पडलेल्या क्रिकेट सामन्यानंतर भारतीय क्रीडा रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. हा उत्साह होता पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा ८९ धावांनी धुव्वा उडवण्याचा. विश्वचषक २०१९ मध्ये भारतीय संघाकडून धावांचा डोंगर उभा केल्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानी संघ मैदानात उतरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला पाकिस्तानचे फलंदाज चांगल्या कामगिरीच्या दिशेने वाटचाल करत होते. पण, तीन गडी तंबूत परतल्यानंतर मात्र सारा डाव कोलमडला आणि याला जोड मिळाली ती म्हणजे पावसाची. एकिकडे मैदानावर सामना रंगत होता, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि भारतामध्ये हा सामना सुरु झाल्यापासून किंबहुना सामना सुरु होण्यापूर्वीपासूनच #IndiaVsPakistan असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता. 









पुढे सामना संपल्यानंतर तर, या हॅशटॅगला साथ मिळत गेली ती म्हणजे धमाल मीम्सची. भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या क्रीडाप्रेमींनी सामन्यातील काही क्षणांवर प्रकाशझोत टाकला आणि त्याच बळावर या विजयाला आनंदाचीही जोड देण्यात आली. 




पाकिस्तानी खेळाडूंच्या एक- एक मुद्रांनाही यातून लक्ष करण्यात आलं. ज्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार सरफराज अहमद याची. पावसामुळे जवळपास अर्ध्या तासाच्या विलंबानंतर ज्यावेळी खेळाडू मैदानात आले, तेव्हा सरफराज अहमदने जांभई दिली आणि बस्स.... अनेक कॅमेऱ्यांनी तो क्षण टीपला. यावनरुन त्याची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली, त्याच्यावर निशाणाही साधला गेला. 




विश्वचषकाच्या यंदाच्या पर्वात भारत पाकिस्तान सामन्याकडे साऱ्या विश्वाचं लक्ष लागलेलं होतं. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत पाकिस्तानच्या संधाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं आव्हान ठेवलं. पण, ते पेलताना मात्र पाकिस्तानच्या संघाची दमछाक झाली. त्यातच पावसाचा खोळंबा आणि फलंदाजांची घसरगुंडी याचा फटका पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला बसला आणि भारताच्या नावे सामना घोषित करण्यात आला.