Ind vs SA: विकेट्स, विकेट्स अन् नुसत्या विकेट्स... दक्षिण आफ्रिका 55 वर ऑल आऊट; सिराजचा Sixer
India vs South Africa 2nd Test Day 1: नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय यजमान संघाला चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे.
India vs South Africa 2nd Test Day 1: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या कसोटीमध्ये नाणेफेक जिंकून यजमान संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणं महागात पडलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांवर बाद झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यामध्ये 6 विकेट्स घेत भन्नाट कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 24 ओव्हरच्या आतच बाद झाला.
34 वर अर्धा संघ तंबूत परतला
विकेटकीपर काएल व्हेरीन आणि मार्के यान्सन वगळता एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. आपल्या शेवटच्या कसोटीत कर्णधार पद भूषवणारा डीन एल्गर आणि एडीन मार्करम हे दोघेजण सलामीसाठी आले. मात्र सामन्यातील चौथ्यार ओव्हरला मार्करम बाद झाला. त्यानंतर अवघ्या 2 ओव्हरनंतर एल्गरही संघ 8 धावांवर असताना तंबूत परतला. दोघांनाही मोहम्मद सिराजने बाद केलं. एल्गर बोल्ड झाला तर मार्करमला यशस्वी जयस्वालकरवी सिराजने झेलबाद केलं. यानंतर टोनी डी झोर्झी आणि स्ट्रीसॅण्ट स्टब्सही स्वस्तात तंबूत परतले. या पैकी टोनीला सिराजने विकेटकीपर के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं. तर स्टब्सला जसप्रीत बुमराहने कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. 10 ओव्हरआधीच यजमानांची अवस्था 15 वर 4 बाद अशी झाली होती. यानंतर डेव्हिड बेडिंगहॅम आणि काएल व्हेरीनने 19 धावांची पार्टनरशीप केली. मात्र संघाची धावसंख्या 34 वर असताना यशस्वी जयस्वालकरवी सिराजने झेलबाद केलं. 34 धावांवर यजमांनाचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
शेवटच्या 5 विकेट्स 20 धावांमध्ये
दक्षिण आफ्रिकेचा संघ 34 वर असतानाच मार्के यान्सनला सिराजने शुभमन गीलकरवी झेलबाद केलं. त्यानंतर 11 धावांची भर पडली आणि दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 45 वर असताना काएल व्हेरीन वैयक्तिक 15 धावांवर बाद झाला. संघाची धावसंख्या एकाने वाढली तेव्हा केशव महाराजला मुकेश कुमारने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केलं. ही दक्षिण आफ्रिकेची आठवी विकेट ठरली. नांड्रे बर्गर आणि कगिसो राबाडा हे दोघेही संघाची धावसंख्या 55 वर असताना झेलबाद झाले.
भन्नाट गोलंदाजी
भारताकडून केवळ 4 वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराहने 8 ओव्हरपैकी एक ओव्हर निर्धावर टाकली. त्याने 25 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने 9 ओव्हरपैकी 3 निर्धावर ओव्हर टाकल्या आणि 6 विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने 4 ओव्हरपैकी 1 ओव्हर निर्धाव टाकली. कृष्णाने 10 धावा दिल्या मात्र त्याला विकेट घेता आली नाही. मुकेश कुमारने 2.2 ओव्हरमध्ये एकही धाव न देता 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या दोन्ही ओव्हर निर्धाव पडल्या हे विशेष.