नागपूर : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्या नागपूरमध्ये दुसरी टेस्ट खेळली जाणार आहे. तीन टेस्टच्या सीरिजमध्ये पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. आता दुस-या टेस्टमध्ये विजय साकारत सीरिजमध्ये आघाडी घेण्यासाठी भारत आतूर असेल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कोलकाता टेस्टमध्ये पहिले दोन दिवस कोहली एँड कंपनी संघर्ष करताना दिसली. यातच पावसानं वारंवार विघ्न निर्माण केल्यानं पहिली टेस्ट काही टीम इंडियाला जिंकता आली नाही. यामुळे सीरिज क्लिन स्विप करण्याचं टीम इंडियांचं स्वप्न भंगलं. 


आता नागपुरच्या जामठातील मैदानावर दुसरी टेस्ट रंगणार आहे. यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. कोलकाता टेस्टमध्ये कोहली पहिल्या इनिंगमध्ये डकवर आऊट झाला होता. तर दुस-या इनिंगमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली होती. यामुळे नागपूरमध्येही तो कामगिरीची पुनरावृत्ती करतो का याकडेच त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलय. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार नागपूर टेस्टमध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाहीत. यामुळे मुरली विजयवर ओपनिंगच्या आशा केंद्रीत झाल्या आहेत. तर भुवीच्या जागी टीममध्ये स्थान देण्यात आलेल्या विजय शेखरला करियरमधील टेस्ट खेळण्याची संधी मिळते का हे पहावं लागेल. लोकल बॉय उमेश यादववरही सा-यांच्या नजरा असतील. 


के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीवर प्रामुख्यानं रन्स करण्याची जबाबदारी असेल. तर कोलकाता टेस्टमधील अपयशी मागे सोडून नागपूर टेस्टमध्ये आपलं गुणवत्ता  दाखवण्याचं आव्हान अजिंक्य रहाणेसमोर असेल. नागपूर टेस्टमध्येही खेळपट्टीवर गवत असल्यानं आणि जर पुन्हा एकदा लंकेनं टॉस जिंकला तर सुरंगा लकमल  पुन्हा एकदा भारतीय बॅट्समनसाठी डोकेदुखी ठरु शकतो. 


कोलकाता टेस्टमध्ये पाचव्या दिवशी भारतीय टीमनं श्रीलंकेला ज्याप्रमाणं पराभवाच्या छायेत नेऊन ठेवलेलं त्यामुळे भारतीय टीमचं मनोबल नक्कीच उंचावलं असेल. यामुळे लंकेला अधिक तयारीनिशी या टेस्टमध्ये उतरावं लागेल. 


श्रीलंकेनंतर भारतीय टीम दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणार आहे. त्या दौ-याच्या तयारीसाठीच लंकन विरुद्धच्या सीरिजसाठी फास्ट बॉलर्सना मदतगार पिच बनवली जात आहे. यामुळे नागपुरमध्येही पुन्हा फास्ट बॉलर्सचीच चलती बघायला मिळण्याची शक्यता आहे. 


सामन्याची वेळ : सकाळी साडेनऊ वाजता.