मुंबई : ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या तुफान अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने दुसरा वनडे सामना जिंकला आहे. अक्षर पटेलच्या 64 धावांच्या नाबाद अर्धशतकाच्या खेळीने टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 2 गडी आणि 2 बॉल राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये  6 विकेट गमावून 311 धावा केल्या होत्या.वेस्ट इंडिजकडून शाई होपने 135 चेंडूत 115 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले. निकोलस पूरनने 74 धावा, मेयर्सने 39 आणि ब्रुक्सने 35 धावांचे योगदान दिले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ 311 धावा गाठू शकली. आणि टीम इंडियासमोर 312 धावांचे लक्ष्य होते.  


वेस्ट इंडिजने दिलेल्या 312 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नव्हती. टीम इंडियाकडून शिखर धवन आणि शुभमन गिल सलामीला उतरले होते. यादरम्यान धवन अवघ्या 13 धावा करून बाद झाला. तर शुभमनने 49 चेंडूत 43 धावा केल्या. श्रेयस अय्यरने शानदार 63 धावा करत अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. 


संजू सॅमसनने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. दीपक हुडाने 36 चेंडूत 33 धावा केल्या. शार्दुल ठाकूर अवघ्या 3 धावा करून बाद झाला. आवेश खानने 10 धावांचे योगदान दिले. 


टीम इंडियाचे एका मागोमाग एक विकेट पडत असताना अक्षर पटेलने एक बाजू सांभाळून धरली होती. अक्षरने 35 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. अक्षरच्या या खेळीने टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. टीम इंडियाने 2 विकेट आणि 2 बॉल राखत हा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. 


शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 54 धावा देत 3 बळी घेतले. तर दीपक हुडाने 9 षटकात 42 धावा देत एक विकेट घेतली. अक्षर पटेलने 9 षटकात 40 धावा देत एक विकेट घेतली. युझवेंद्र चहल, आवेश खान आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली.