India vs WI: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून पहिल्या कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने एकहाती वर्चस्व मिळवलं असून, वेस्ट इंडिजची दाणादाण उडवली आहे. डोमिनिका येथील सामन्यात भारतीय फलंदाज यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) पदार्पणातच शतक ठोकत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. पदार्पणातच शतक ठोकणारा तो 17 वा फलंदाज ठरला आहे, तर विदेशात अशी कामगिरी करणारा 13 वर्षातील पहिला खेळाडू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा यशस्वी 40 धावांवर खेळत होता. दिवसाअखेर त्याने 143 धावा ठोकत जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. दरम्यान, यशस्वीने ही आपल्यासाठी फार भावनिक खेळी होती अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच भारतीय संघात स्थान मिळणं फार कठीण असल्याची कबुली दिली. 


"मला वाटतं ही माझ्यासाठी फार भावनिक खेळी होती. भारतीय संघात स्थान मिळणं फार कठीण असतं. मला माझे चाहते, संघ व्यवस्थापन आणि रोहित भाईचे आभार मानायचे आहेत," असं यशस्वी जैस्वालने म्हटलं आहे.


"ही खेळपट्टी धिमी असून, कठीण आणि आव्हानात्मक स्थिती होती. प्रचंड ऊन असून मला माझ्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. प्रत्येक चेंडू खेळत मला आनंद लुटायचा होता. मला कसोटी क्रिकेट आणि ते आव्हान आवडतं. जेव्हा बॉल स्विंग होतो तेव्हा मला फार आवडतं," असं यशस्वीने म्हटलं आहे.



"आम्ही फार परिश्रम घेतले आहेत. मी मैदानात जाऊन व्यक्त झालो. शतक झाल्यानंतर माझ्यासाठी तो भावनिक क्षण होता. मला माझा फार अभिमान वाटत आहे. मी सर्वांचा आभारी आहे. ही फक्त सुरुवात असून, पुढेही चांगलं खेळण्याची इच्छा आहे," असं यशस्वी म्हणाला आहे.
पदार्पणात शतक ठोकत यशस्वी सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे आणि देशाबाहेर पदार्पणात हा टप्पा गाठणारा 13 वर्षांतील पहिला फलंजाज आहे. 2010 मध्ये सुरेश रैनाने भारतबाहेर खेळाताना श्रीलंकेविरुद्ध पदार्पणातच कसोटी सामन्यात शतक झळकावलं होतं. 


याशिवाय, शिखर धवन (2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 187) आणि पृथ्वी शॉ (2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134) यांच्या पावलावर पाऊल ठेवत, जैसवाल कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा तिसरा भारतीय सलामीवीर ठरला.


यशस्वीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत केवळ 15 प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. पण त्यातही त्याने नऊ शतकं ठोकली असून 80 पेक्षा जास्त सरासरी आहे. दुलीप ट्रॉफी फायनलच्या दुसऱ्या डावात त्याने 265 धावा ठोकल्या होत्या. 


यशस्वीने 70 व्या षटकात कसोटी पदार्पणातील शतक ठोकलं, यादरम्यान रोहित शर्मासह त्याने 200 हून जास्त धावांची भागीदारीही पूर्ण झाली होती. रोहितनेही शतक ठोकलं, मात्र त्यानंतर तो लगेच बाद झाला. यशस्वी आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी 229 धावा केल्या. वेस्ट इंडिजविरोधातील ही दुसरी सर्वाधिक भागीदारी आहे.  


वेस्ट इंडिजविरोधातील सर्वाधिक सलामीच्या भागीदारीचा विक्रम विजय मांजरेकर आणि पंकज रॉय यांच्या नावावर आहे. त्यांनी 1953 मध्ये सबिना पार्क येथे दुसऱ्या विकेटसाठी 237 धावांची भागीदारी केली होती.


दरम्यान सध्या विराट कोहली आणि यशस्वी मैदानात आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी त्यांनी 72 धावांची भागीदारी केली. यशस्वी 143 धावांवर नाबाद आहे. भारताची धावसंख्या 312 वर 2 गडी बाद आहे.