बर्मिंगहॅम : 22 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगच्या पुरुषांच्या 67 किलोग्रॅम फायनलमध्ये भारताचे पाचवे पदक पटकावले आहे. जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. जेरेमीने स्नॅचमध्ये विक्रमी 140 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलण्यात त्याला यश आले. म्हणजेच, एक गेम्स रेकॉर्ड करत त्याने एकूण 300 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या राऊंडमधून बाहेर 
जेरेमी लालरिनुंगाने स्नॅच फेरीच्या पहिल्या प्रयत्नात 136 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात जेरेमीने 140 किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. अशाप्रकारे, स्नॅच फेरीत त्याचे सर्वोत्तम 140 किलो होते.


जेरेमी लालरिनुंगाने पहिल्या क्लीन अँड जर्कमध्ये 154 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 160 किलो वजन उचलले. या सामन्यात वजन उचलताना त्याला दुखापत देखील झाली, पण त्याने हार न मानता भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दुसरीकडे, समोआच्या वायवापा आयोनने एकूण २९३ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.


भारताच्या खात्यात 5 पदकं 
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण ५ पदके झाली आहेत. तर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. जेरेमी लालरिनुंगा यांच्या आधी संकेत सरगर, गुरुराज पुजारी, मीराबाई चानू आणि बिंदयाराणी देवी यांनी भारताच्या झोळीत पदके टाकली होती.