पुणे : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं शानदार विजय झाला आहे. 231 रन्सचा पाठलाग करताना भारतानं 46 ओव्हरमध्ये 232/4 एवढा स्कोअर केला. भारताकडून शिखर धवननं सर्वाधिक 68 रन्स बनवल्या तर दिनेश कार्तिकनं नाबाद 64 रन्स करून भारताचा विजय सोपा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडनं दिलेल्या 231 रन्सचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा फक्त 7 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर शिखर धवननं कोहलीसोबत आणि मग कार्तिकसोबत महत्त्वाची पार्टनरशीप करून भारताचा विजय सोपा केला.


मागच्या मॅचमध्ये शतक झळकवणारा विराट कोहली या मॅचमध्ये 29 रन्सवर आऊट झाला. तर हार्दिक पांड्यानं 31 बॉल्समध्ये 30 रन्स केल्या. धोनी 18 रन्सवर नाबाद राहिला.


न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी करत 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 230/9वर रोखलं. न्यूझीलंडच्या एकाही बॅट्समनला अर्ध शतकापर्यंतही मजल मारता आली नाही. हेन्री निकोलासनं सर्वाधिक 42 रन्स बनवल्या.


भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर बुमराह आणि युझुवेंद्र चहलला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि अक्सर पटेलला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.


मुंबईमधल्या पहिल्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर भारताला सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मॅच जिंकणं आवश्यक होतं. या विजयाबरोबरच 3 मॅचची सीरिज 1-1नं बरोबरीमध्ये आहे. भारत आणि न्यूझीलंडमधली तिसरी वनडे रविवारी कानपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे.