मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक तुषार अरोठेंनी राजीनामा दिला आहे. भारतीय टीममधल्या काही खेळाडूंसोबत मतभेद झाल्यामुळे अरोठेंनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. अरोठेंच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर काही खेळाडूंचा आक्षेप होता आणि याची तक्रारही खेळाडूंनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं नेमून दिलेल्या समितीनं बीसीसीआयचा कारभार बघायला सुरुवात केल्यानंतर हा दुसऱ्या प्रशिक्षकाचा राजीनामा आहे. याआधी भारतीय पुरुष टीमचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कर्णधार विराट कोहलीबरोबर मतभेद झाल्यामुळे पदाचा राजीनामा दिला होता.


खेळाडूंच्या तक्रारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयनं तुषार अरोठेंचा राजीनामा मंजूर केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा देत आहे. बीसीसीआयनं मला संधी दिल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असं अरोठे म्हणाले. पण खेळाडूंच्या तक्रारीमुळे अरोठेंना जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली.


खेळाडूंची बीसीसीआयसोबत बैठक


भारतीय महिला खेळाडूंची सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीबरोबर बैठक झाली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी, सबा करीम, सीईओ राहुल झोरी उपस्थित होते. या बैठकीत खेळाडूंनी अरोठेंच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर टीका केली. यामध्ये निवड समिती सदस्य आणि टीम मॅनेजरचाही समावेश होता. बीसीसीआयमधल्या सूत्रांकडून पीटीआयला ही माहिती देण्यात आली. दोन बड्या खेळाडूंनी अरोठेंना हटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही हा अधिकारी म्हणाला.


या अधिकाऱ्यानं खेळाडूंचं नाव सांगितलं नसलं तरी भारतीय वनडे टीमची कर्णधार मिथाली राज आणि टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर यांचं अरोठेंविषयीचं मत फारसं चांगलं नव्हतं, असं बोललं जातंय.


भारतीय टीमची खराब कामगिरी


बडोद्याच्या तुषार अरोठेंनी ११४ फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. मागच्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला होता. तेव्हा अरोठे भारताचे प्रशिक्षक होते. दक्षिण आफ्रिकेमध्येही वनडे आणि टी-२०मध्ये भारताचा विजय झाला तेव्हा अरोठेच प्रशिक्षक होते. पण यानंतर मात्र भारतीय टीमची कामगिरी निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारतानं खराब कामगिरी केली. तर आशिया चषकामध्ये बांगलादेश सारख्या दुबळ्या टीमकडून भारताला पराभवाचा धक्का बसला. यानंतर अरोठेंचं पद धोक्यात आलं.


अरोठेंना विरोध का?


सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी अडीच तासांचा सराव करण्यासाठी अरोठे आग्रही होते. पण टीममधल्या ३० वर्षांच्या वरच्या खेळाडूंना हा सराव कठीण जात होता. खेळाडूंच्या विरोधामुळेच १५ जून ते २५ जूनमध्ये होणारा कॅम्प रद्द करण्यात आला.


कोण होणार पुढचा प्रशिक्षक?


महिला टीमच्या पुढच्या प्रशिक्षकासाठी जाहिरात दिली जाईल आणि त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती होतील, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.