भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का; तिरंदाजी संघटनेवर निलंबनाची कारवाई
भारतीय महासंघ व जागतिक संघटना आमचे म्हणणे ऐकून घेण्याच्या तयारीत नाही.
नवी दिल्ली: जागतिक तिरंदाजी संस्थेने भारताच्या तिरंदाजी संघटनेवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जागतिक तिरंदाजी संस्थेने ५ ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध ही कारवाई केल्याचे आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
भारतीय तिरंदाजी संघाच्या निवडीसाठी जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने जागतिक संघटनेने भारताला निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू १९ ते २५ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या जागतिक तिरंदाजी चषक स्पर्धेत भाग घेणार आहेत. मात्र, यानंतरच्या भारतीय खेळाडुंच्या भवितव्याविषयी साशंकता आहे.
या निर्णयासंदर्भात माहिती देताना जागतिक तिरंदाजी संघटनेचे सचिव टॉम डिएलन यांनी सांगितले की, भारत आगामी जागतिक तिरंदाजी चषक स्पर्धेत भाग घेऊ शकेल. मात्र, आता आम्ही भारतीय ऑलिम्पिक महासंघ आणि भारतीय क्रीडा मंत्रालयाशी समन्वय साधून एक समिती स्थापन करण्याचा प्रयत्न करू. या समितीमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील. ही समिती महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करेल.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या मुद्द्यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघ खेळणार की नाही, याचा निर्णयही घेतला जाईल. तसेच इनडोअर आर्चरी वर्ल्ड सिरीजमध्ये भारतीय खेळाडू वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकतात का, याविषयीही जागतिक तिरंदाजी संघटनेकडून निर्णय घेतला जाईल, असे टॉम डिएलन यांनी सांगितले.
जागतिक तिरंदाजी संघटना आणि भारतीय तिरंदाजी महासंघातील या वादामुळे खेळाडुंचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आता आम्हाला महासंघाच्या पाठिंब्याशिवाय इनडोअर आर्चरी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळावे लागेल. त्यामुळे आम्हाला भारताकडून सुविधा मिळणार नाहीत. भारतीय महासंघ व जागतिक संघटना आमचे म्हणणे ऐकून घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार, याची टांगती तलवार आमच्यावर असल्याची प्रतिक्रिया भारताची खेळाडू लैश्राम बोंबल्या हिने व्यक्त केली.